वांद्रे पश्चिम बँडस्टँड येथील ‘मन्नत’ बंगल्याजवळील ‘जिवेश’ इमारतीच्या १४ व्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी ७.४५ च्या सुमारास आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर रात्री उशिरा नियंत्रण मिळवले.
‘जिवेश’ ही तळ अधिक २१ मजली इमारत आहे. या इमारतीच्या १४ व्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी आगीचा भडका उडाला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने लेव्हल दोनची आग जाहीर करण्यात आली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी ८ फायर इंजिन, रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात रात्री उशिरा यश आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, या आगीच्या घटनेची स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी तपास करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.