आयपीएलच्या औपचारिक ठरलेल्या ७०व्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर रविवारी सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षट्कांत आठ गडी बाद १५७ धावा केल्या. अभिषेक शर्माने (३२ चेंडूत ४३) हैदराबादच्या डावाला आकार दिला. पंजाबच्या हरप्रित ब्रार आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
डावाच्या तिसऱ्या षट्कात सलामीवीर प्रिय गर्ग अवघ्या चार धावांवर बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्रिपाठी २० धावांवर बाद झाला. अभिषेकचाही संयम मग सुटला. अकराव्या षट्कांत तो बाद झाला. निकोलस पुरनला फार काही करता आले नाही. तो पाच धावांवर बाद झाला. एडन मार्करमने २१ धावांचे योगदान दिले. नंतर वॉशिंग्टन सुंदर (१९ चेंडूत २५) आणि रोमारिओ शेफर्ड (१५ चेंडूत नाबाद २६) यांच्यात ५८ धावांची भागीदारी २९ चेंडूंत झाली.