मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या धोरणानुसार पालिका कर्मचाऱ्यांची तीन वर्षांनी बदली करण्याचा कायदा आहे. मात्र, पालिकेच्या अनेक विभागात या कायद्याला केराची टोपली दाखवली जाते. मागील कित्येक वर्षांपासून पालिकेच्या लेखा विभागातील ९ कनिष्ठ व वरिष्ठ लेखापरीक्षक बिलिंग विभागात कार्यरत आहेत. माणुसकीचा दृष्टिकोन नजरेसमोर ठेऊन या विभागातील कर्मचाऱ्यांची बदली होत नसल्याचा अजब दावा लेखा विभागाच्या प्रमुखांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या लेखा विभागांतर्गत विविध विभागात काम केले जाते. यामध्ये अर्थसंकल्प लेखा, महसूल, अंतर्गत लेखा विभाग आस्थापना, पीएफ, रोख, जीएसटी व आयकर विभाग व रजा पडताळणी असे अनेक विभाग कार्यरत आहेत. लेखा विभागातील कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली करून त्यांना याच विभागांतर्गत असलेल्या विविध विभागांमध्ये बदली करता येते. मात्र या विभागातील बिलिंग विभाग असा आहे ज्यामध्ये असलेले काही कर्मचारी दुसऱ्या प्रभागात बदली झाल्यावर सुद्धा बिलिंग विभागातच काम करतात. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या किंवा विकासकामांच्या निविदांची बिले, कंत्राटदारांची देयके या विभागामार्फत अदा करण्यात येतात. पालिका मुख्यालयासह मुंबई आणि उपनगरात नऊ ठिकाणी हे बिलिंग विभाग आहेत. या विभागातून अधिक मलिदा मिळत असल्याचा आरोप अन्य कर्मचाऱ्यांनी केला आहे.
पालिकेच्या नियमानुसार बिलिंग विभागातील कर्मचाऱ्यांचीही बदली करण्यात येते. त्यामुळे ते वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. परंतु काही अनुभवी लोक असतात, काही जणांना कौटुंबिक किंवा वैद्यकीय अडचणी असतात, अशा वेळेस माणुसकीच्या चष्म्यातून त्यांचा विचार करावा लागतो. तर बदलीसाठी आम्ही लवकरच लॉटरी पद्धत राबवणार आहोत, त्यानुसार कर्मचाऱ्यांची बदली करणार आहोत.
- पांडुरंग गोसावी, प्रमुख लेखापाल, मुंबई महानगरपालिका