अभिनेते गिरीश ओक बनले मीरा-भाईंदर महापालिकेचे 'स्वच्छता दूत' X | My_MBMC
मुंबई

अभिनेते गिरीश ओक बनले मीरा-भाईंदर महापालिकेचे 'स्वच्छता दूत'

महापालिकेच्या 'शून्य कचरा' अभियानाला अधिक प्रभावी करण्यासाठी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची महापालिकेच्या स्वच्छता दूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Swapnil S

भाईंंदर : शहर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त करण्याबरोबरच कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या 'शून्य कचरा' अभियानाला अधिक प्रभावी करण्यासाठी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची महापालिकेच्या स्वच्छता दूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेने गेल्या काही वर्षांत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात देशात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान महापालिकेने यापूर्वी मिळवला आहे. हे यश कायम राखत आगामी स्वच्छ सर्वेक्षण २०२६-२७ मध्येही अव्वल स्थान मिळवण्यासाठी प्रशासनाने आता 'शून्य कचरा' धोरणावर विशेष भर दिला आहे.

या अभियानांतर्गत शहरातील कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी घराघरांत ओला व सुका कचरा वेगळा करण्यास प्रोत्साहन, कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून पुनर्वापराला चालना, सिंगल-यूज प्लास्टिकवर संपूर्ण बंदी, तसेच रस्ते, निवासी संकुले, उद्याने, नाट्यगृहे आणि समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. या अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्या हस्ते अभिनेते गिरीश ओक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांची महापालिकेच्या स्वच्छता दूत म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली. तसेच आगामी जनजागृती मोहिमांचे नियोजन, नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठीचे उपक्रम आणि अभियानाची रूपरेषा याबाबत पालिका अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

‘शून्य कचरा’ संकल्पनेला चालना मिळेल

गिरीश ओक हे स्वतः मीरा-भाईंदरचे रहिवासी असून शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. नागरी समस्या आणि शहरातील गैरप्रकारांविरोधात त्यांनी सातत्याने परखड भूमिका मांडली आहे. त्यांची स्वच्छ प्रतिमा, सामाजिक बांधिलकी आणि लोकप्रियता लक्षात घेता, त्यांच्या सहभागामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत अधिक जागरूकता निर्माण होऊन शहराला 'शून्य कचरा' संकल्पनेकडे नेण्याच्या अभियानाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्टपासून परवानगी; किनारी जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

Mumbai : मेट्रो स्टेशनवर आता झोपण्याची सोय; अंधेरी मेट्रो स्थानकात देशातील पहिली स्लीप पॉड सेवा सुरू

२९ ऑगस्टपासून ‘शेवटचे आणि निर्णायक’ आंदोलन; मनोज जरांगेंचा इशारा

फोर्टमधील 'पूर्णिमा' हॉटेलची हायकोर्टात याचिका; FDA च्या कारवाईला आव्हान

शाडूची माती की POP, प्रदूषण कशाने? सरकारची शुक्रवारी बैठक; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पावले उचलणार