मुंबई

सायबर सिक्युरिटीनंतर आता केमिस्ट्रीमध्ये सहपदवी; मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठाची एकत्रित पदवी

एमएस डेटा ॲॅनालिटिक्स आणि एमएस सायबर सिक्युरिटी या दोन अभ्यासक्रमांच्या सहपदवीला विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, मुंबई विद्यापीठाने केमिस्ट्रीमध्ये सहपदवीसाठी पुढाकार घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : एमएस डेटा ॲॅनालिटिक्स आणि एमएस सायबर सिक्युरिटी या दोन अभ्यासक्रमांच्या सहपदवीला विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, मुंबई विद्यापीठाने केमिस्ट्रीमध्ये सहपदवीसाठी पुढाकार घेतला आहे. नुकतेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो यांची सेंट लुईस मिसोरी स्टेट यूएसए येथे भेट घेऊन पदव्युत्तर स्तरावरील केमिस्ट्रीमध्ये सहपदवीच्या शिक्षणासाठी स्वारस्य दाखवले आहे. याबाबत लवकरच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून दोन्ही विद्यापीठामार्फत एमएससी केमिस्ट्री या सहपदवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण मुंबई विद्यापीठात तर द्वितीय वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण सेंट लुईस विद्यापीठात मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिपही करता येणार आहे. विशेष म्हणजे, सहपदवी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या या सहपदवीमुळे प्रत्येक संस्थेच्या सामर्थ्याचा आणि कौशल्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टता वृद्धीस हातभार लागणार आहे.

एमएससी केमिस्ट्री या अभ्यासक्रमासाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय वातावरणात केमिस्ट्रीमधील विविध विषयातील अध्ययनाच्या शाखा, संशोधन पद्धती, अद्ययावत प्रयोगशाळा आणि उपकरणांचा अभ्यास करता येईल. त्याचबरोबर या सहयोगांतर्गत दोन्ही विद्यापीठातील पायाभूत व अनुषंगिक सुविधा, कौशल्य आणि आधुनिक उपकरणे आणि संसाधनाच्या एकत्रित वापरामुळे अध्ययन व संशोधनातील संभाव्य परिणाम साध्य करता येऊ शकणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच या कराराची व्याप्ती वाढवून मानव्यविज्ञान विद्याशाखेअंतर्गत समाजशास्त्र विषयात सह पदवीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. या करारामुळे उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने वाटचाल करताना रसायनशास्त्र शाखेतील उद्योन्मुख क्षेत्रात भारत आणि अमेरिकेतील संशोधनाच्या प्राधान्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील जागतिक समज विस्तृत करण्यास मदत होईल तसेच विद्यार्थ्यांसाठी संधीचे नवे दालनही खुले होणार असल्याचेही प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

सहपदवीचे फायदे

  • विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळवण्याची संधी

  • मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठाकडून मिळणाऱ्या सहपदवीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीची आंतरराष्ट्रीय ओळख वाढविण्यास मदत

  • विद्यार्थ्यांना भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील वैविध्यपूर्ण शैक्षणिक वातावरण, अध्यापन पद्धती आणि संशोधन पद्धतींचा फायदा

  • दोन वेगवेगळ्या देशांमध्ये राहणे आणि अभ्यास करण्यामुळे विद्यार्थ्यांना सांस्कृतिक जागरूकता, अनुकूलता आणि भाषा कौशल्ये विकसित करण्यास मदत

  • सांस्कृतिक आणि भाषा कौशल्ये वृद्धीस मदत

  • दोन्ही संस्थांमधील अत्याधुनिक संशोधन सुविधा आणि प्रयोगशाळांच्या प्रवेशामुळे व्यावहारिक कौशल्ये आणि संशोधन क्षमता वाढीस चालना

विद्यार्थ्यांना सहाय्य

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी सहाय्य केंद्राच्या वतीने सेंट लुईस विद्यापीठात द्वितीय वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिसा सुलभीकरण, तज्ज्ञांकडून सपुदेशन, कागदपत्रांचे साक्षांकीकरण, शिष्यवृत्ती सहाय्य, वसतिगृह सहाय्य अशा अनुषंगिक बाबींसाठी सहाय्य केले जाणार आहे.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल

Mumbai : १५ वर्षांनंतर MMRDA चा निर्णय; वडाळा ट्रक टर्मिनल प्लॉटचा १,६२९ कोटींना लिलाव होणार

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन