मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका कामाला; कासारवाडीची टप्याटप्याने दुरुस्ती

नवशक्ती Web Desk

मुंबई : दादर येथील कासारवाडीचा टप्याटप्याने दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात चाळ क्रमांक एफ व चाळ क्रमांक ई -ब्लॉकमधील शौचालय दुरुस्ती, रंगरंगोटी, छताला प्लास्टर करणे अशी विविध कामे हाती घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पालिकेने तातडीने निविदा मागवल्या असून, पहिल्या टप्प्यात दुरुस्तीसाठी एक कोटी ५२ लाख रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात ही १ कोटी ७६ लाखांच्या निविदा मंजूर करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच कासार वाडीला भेट दिली होती. या भेटीत कासारवाडी वसाहतींची दुरवस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी झटणाऱ्या कामगारांच्या वसाहतींची दुरवस्था यावर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्या, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर तातडीने निविदा मागवल्या असून, लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे पालिकेच्या जी उत्तर विभागाकडून सांगण्यात आले.

वसाहतीत ४५९ सदनिका

दादर कासारवाडी व प्रभादेवी येथील सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजनेंतर्गत पुनर्विकासासाठी दोन वर्षांपूर्वी कंत्राटदार निश्चित करण्यात आला होता. विविध करांसह ४७८ कोटी रुपये खर्च केले जाणार होते. या वसाहतीत ४५९ सदनिका असून, पुनर्विकासात ९८ हजार २९ चौरस मीटर क्षेत्रफळात ३०० चौरस फुटांच्या १३९९ सदनिका आणि ६०० चौरस फुटांच्या १४५ सदनिका पालिकेने प्रस्तावित केल्या होत्या. कंत्राटदाराने लावलेल्या बोलीमध्ये ३०० चौरस फुटाच्या १५९७ आणि ६०० चौरस फुटाच्या १८० सदनिका बांधून देण्याचे प्रस्तावित केले होते; मात्र स्थायी समितीने विरोध केल्याने या पुनर्विकासाचा प्रस्ताव कायमचा रद्द करण्यात आला. त्यामुळे सद्यस्थितीत दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी सरप्राइज व्हिजीट करत केली होती पाहणी 

दादर प्रभादेवी येथील सफाई कामगारांच्या एकूण १२ चाळी आहेत. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी झटणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींची एकनाथ शिंदे यांनी सरप्राइज व्हिजीट देत पाहणी केली. यावेळी कासारवाडी वसाहतींची दुरवस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस