मुंबई : मेंदूच्या आजाराचे वेळीच निदान व्हावे, यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयात १५० रुग्णांची एआय आधारित तपासणी करण्यात येणार असून प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पालिकेच्या सर्वच रुग्णालयात मेंदूच्या आजाराचे निदान करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल, असे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘स्माईल कॉन्सिल’ या बिझनेस इनक्युबेशन सेंटरअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्रकल्पाला पालिकेकडून प्रायोगिक स्वरूपात हिरवा कंदील देण्याची तयारी सुरू आहे. मेंदूविषयक आजारांचे अधिक अचूक निदान व विश्लेषण करण्यासाठी मे. ब्रेनसाइटएआय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपने विकसित केलेला प्रकल्प केईएम रुग्णालयात राबविण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ४ कोटी ९९ लाख १२ हजार ३३० रुपये खर्च करण्यात येणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मोठ्या प्रमाणातील वैद्यकीय माहितीचे वेगाने विश्लेषण करण्याची क्षमता आहे. पारंपरिक पद्धतीत एमआरआय, सीटी स्कॅन, ईईजी यांसारख्या तपासण्यांचे विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञांना बराच वेळ द्यावा लागतो. एआय प्रणाली मात्र काही मिनिटांत किंवा तासांमध्ये या माहितीचे विश्लेषण करून संशयास्पद भाग, मेंदूतील गाठींचे स्वरूप किंवा अपस्माराचा संभाव्य केंद्रबिंदू ओळखण्यास मदत करू शकते.
त्यामुळे निदान अधिक जलद, अचूक आणि उपचार नियोजनासाठी उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास भविष्यात महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक एआय-आधारित निदान सुविधा उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे मेंदूविकारांच्या उपचारांची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
मेंदूच्या कार्यक्षमतेत होणारे बदल तपासले जाणार
या प्रकल्पांतर्गत अपस्मार आणि मेंदूतील गाठी असलेल्या १५० रुग्णांवर १२ महिन्यांच्या कालावधीत अभ्यास करण्यात येणार आहे. रुग्णांच्या शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेत होणारे बदल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तपासले जातील. शस्त्रक्रियेनंतर एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांनी रुग्णांची तपासणी करून त्याच्या नोंदी ठेवण्यात येणार आहेत.