मुंबई

दारू पिण्यावरून वाद : मुलीवर पित्याकडून हल्ला; आरोपी पित्याला अटक व कोठडी

Swapnil S

मुंबई : दारू पिण्यावरून झालेल्या वादातून २३ वर्षांच्या मुलीवर तिच्याच पित्याने सुरीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना दादर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच सतीश सूर्यकांत धुरी या आरोपी पित्याला दादर पोलिसांनी अटक केली आहे.

अटकेनंतर त्याला भोईवाडा येथील स्थानिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या वैभवी सतीश धुरी हिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजता दादर येथील गोखले रोड, सुदर्शन इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३१२ मध्ये वैभवी ही तिचे वडील सतीश धुरी यांच्यासोबत राहते. तिच्या आईचे निधन झाले असून, वडील महिंद्रा कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांना दारू पिण्याचे व्यसन असल्याने तिचे तिच्या वडिलांशी सतत खटके उडत होते. शुक्रवारी दुपारी एक वाजता सतीश नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करून घरी आले होते. यावेळी दारू पिण्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. या वादानंतर सतीशने तिला शिवीगाळ करून आता तुला जिवंत सोडत नाही, असे सांगून किचनमधून भाजी कापण्याची सुरी आणली. काही कळण्यापूर्वीच त्याने सुरीने तिच्या पोटात वार केले होते. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिने आरडाओरड केल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी तिथे धाव घेतली होती.

यावेळी मारिया आंटी आणि जोसेफ अंकल यांनी सतीशला बाजूला करून ही माहिती पोलिसांना दिली. या माहितीनंतर दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या वैभवीला तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी वैभवीची जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर तिचे वडिल सतीश धुरीविरुद्ध पोलिसांनी शिवीगाळ करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.

पुणे ‘हिट ॲण्ड रन’प्रकरणी बिल्डरसह सात जणांना अटक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

देशातील जनताच माझी उत्तराधिकारी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू

‘इंडिगो’त प्रवाशावर उभ्याने प्रवासाची वेळ, चूक लक्षात येताच विमान माघारी परतले

Maharashtra HSC 12th Result: बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे करा अभिनंदन, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!