मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क परिसरासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या व स्मारकांच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आणि ड्रोनचा वापर करावा तसेच वाहतुकीतील बदलांची माहिती नागरिकांना आगाऊ देऊन आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना बनसोडे यांनी केल्या.
दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, वांद्रे आणि मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करावी. अनुयायांच्या व्यवस्थेसाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडाव्यात आणि ६ डिसेंबरला मेगाब्लॉक टाळण्याबाबत रेल्वे प्रशासनाने विचार करावा तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अतिरिक्त बससेवेचे नियोजन करावे, अशी विनंती करण्यात आली.
सार्वजनिक आरोग्य विभागाने ५ व ६ डिसेंबरला वैद्यकीय तपासणी, आरोग्य जनजागृती आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. ६ डिसेंबरला राज्यात ‘ड्राय डे’ घोषित करण्याबाबत तसेच सार्वजनिक सुट्टीसंदर्भातील परिपत्रक आगाऊ प्रसिद्ध करण्याबाबतही संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे सुचवण्यात आले. या बैठकीस गृह विभाग, सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी, चैत्यभूमी समन्वय समिती सदस्य उपस्थित होते.