वसई : अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा सदस्य अजय हरिश्चंद्र वैती यांना अपात्र घोषित करण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले आहेत. माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य चंद्रकांत रामचंद्र मेहेर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरील चौकशी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला.
नोव्हेंबर २०२३ मधील ग्रामपंचायत निवडणुकीत अजय वैती यांनी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या स्वयंघोषणापत्रात शौचालयासंदर्भात चुकीची माहिती देऊन निवडणूक लढवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांनीही नामनिर्देशनपत्रातील माहितीमध्ये तफावत असल्याचा अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.
सरपंच पूजा म्हात्रे यांचा अर्ज प्रलंबित
सरपंच पूजा म्हात्रे यांच्या विरोधातही खोटी माहिती सादर केल्याचा आरोप करत अपात्रतेची मागणी करणारे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच ग्रामनिधी व इतर विकासनिधीतील कथित गैरव्यवहारासंदर्भातील तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे प्रलंबित आहे.