मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू या भारतातील सर्वात लांब पुलाचे उद्घाटन झाले. मात्र, अवघ्या काही दिवसांतच हा सागरी पूल पिकनिक स्पॉट बनला आहे. अनेक प्रवासी अटल सेतूवर आपली वाहने थांबवून सेल्फी आणि फोटोसेशनमध्ये व्यग्र असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला असून एकूण १२० वाहनचालकांना दंड ठोठावला आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू खुला झाल्याने मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर आता दोन तासांवरून दीड ते पावणे दोन तासांवर आले. पुलावरील वेगमर्यादा १०० किमी प्रतितास असल्याने कोणताही धोका पत्करायचा नाही. मात्र, तरीही अनेकजण वाहन थांबवून फोटोशूट करताना दिसत आहेत. एमएमआरडीएने मुंबई वाहतूक पोलिसांना अशा वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आवाहन केले.
हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला असल्यामुळे अनेक वाहनचालकांनी या सागरी सेतूला प्राधान्य दिले आहे. या पुलामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात प्रवास करणाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पुलाची पायाभरणीही करण्यात आली होती. एकूण १७ हजार ८४० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून अटल सेतू बांधण्यात आला. हा पूल २१.८ किलोमीटर लांब आणि ६ लेनचा आहे.