तेजस वाघमारे/मुंबई
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून ४ जणांना जीव गमवावा लागल्यानंतर रेल्वे मंत्रालय खडबडून जागे झाले आहे. लोकलमधून पडून होणारे अपघात टाळण्यासाठी स्वयंचलित दरवाजे असलेली सामान्य लोकल जानेवारी २०२६ मध्ये प्रवाशांच्या सेवेत आणण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने केली आहे. यामध्ये गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर लोकलमधून १३ प्रवासी पडल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री आणि रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’सोबत (आयसीएफ) सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत उपनगरीय मार्गावर धावत असलेल्या लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याबाबत चर्चा झाली. सामान्य लोकलच्या रचनेत बदल करून, हवा खेळती राहील, अशा पद्धतीची रचना लोकलमध्ये केली जाईल, असा निर्णय बैठकीत चर्चेअंती घेण्यात आला.
सामान्य लोकलच्या स्वयंचलित दरवाज्यांना लूव्हर्स (हवेशीर पट्ट्या) असतील. त्यामुळे या लूव्हर्समधून हवा खेळती राहील. तसेच डब्यामध्ये ताजी हवा पंप करण्यासाठी लोकलच्या छतावर व्हेंटिलेशन युनिट लावण्यात येणार आहेत. तसेच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी लोकलच्या एका डब्यामधून दुसऱ्या डब्यामध्ये जाण्याची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. या नवीन रचनेची पहिली लोकल नोव्हेंबर २०२५ पर्यंत तयार होऊन आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्रानंतर ती जानेवारी २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्याचप्रमाणे मुंबई उपनगरी मार्गावर अतिरिक्त २३८ वातानुकूलित लोकल दाखल होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
स्वयंचलित लोकल बिघडवणार वेळापत्रक?
धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र साध्या लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविणे महाकठीण असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. लोकलमधील ऑक्सिजन लेव्हल नियंत्रित ठेवणे आणि दरवाजे उघडण्यास अथवा बंद होण्यास वेळ लागणार असल्याने लोकलचे संपूर्ण वेळापत्रक बिघडेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. लोकलचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यास ५ सेकंद वेळ लागतो, तर बंद होण्यास १५ सेकंद वेळ अपेक्षित धरण्यात आला आहे. मात्र, गर्दीच्या वेळी सर्वच प्रवासी दरवाजांवर गर्दी करून थांबल्यास लोकलचे दरवाजे बंद होण्यास अडथळा येईल. यामुळे लोकलचे वेळापत्रक बिघडून प्रवाशांना आणखी त्रास होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
एसी लोकलचे भाडे कमी करा!
लोकल फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे. यामध्येच वातानुकूलित (एसी) लोकल चालविण्यात येत असल्याने रेल्वे स्थानकावरील गर्दीत भर पडत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी वातानुकूलित लोकलचे भाडे कमी करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे.