मुंबई: डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, ही माहिती मुंबईकरांना उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे अॅप वर्षभरापूर्वी विकसित केले. मात्र १० महिन्यांत फक्त १०० मुंबईकरांनी ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे अॅप डाऊनलोड केले, तर फक्त २५० लोकांनी रजिस्टर केले. त्यामुळे दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईकरांनी महत्त्वपूर्ण अॅपकडे पाठ फिरवली आहे.
पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो असे साथीचे आजार झपाट्याने पसरतात. जून महिन्यांतच लेप्टोचा एक बळी गेला आहे. तर मलेरिया (६७६ रुग्ण), लेप्टो (९७), डेंग्यू (३५३), गॅस्ट्रो (१७४४), हिपेटायटीस (१४१), चिकनगुनिया (८) आणि स्वाइन फ्लू (९०) साथीच्या आजारांचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पावसाळी आजार रोखणे एक आव्हान असणार आहे.
पावसाळी आजारांमध्ये डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी डेंग्यू प्रतिबंधात्मक माहिती मुंबईकरांना मोबाईलवर मिळावी, यासाठी ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे अॅप विकसित करण्यात आले. या अॅपमध्ये डेंग्यूची उत्पत्ती, प्रसार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे अॅप कुटुंबातील एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये असणे गरजेचे असून हे अॅप डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन १० ऑक्टोबर २०२२मध्ये पालिकेच्या किटकनाशक विभागाने केले होते. मात्र या महत्त्वपूर्ण अॅपकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे.
डेंग्यूशी लढा देताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी ही अत्यंत प्रभावी ठरते. त्यामुळेच डेंग्यू आजाराच्या प्रसाराला प्रतिबंध करणाऱ्या बाबी अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ या भ्रमणध्वनी ॲॅपची निर्मिती करण्यात आली आहे. ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे भ्रमणध्वनी ॲॅप तांत्रिक कार्यपद्धतीनुसार २४ ते ४८ तासांत ‘गुगल प्ले स्टोअर’सह अन्य प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक मुंबईकराने आपल्या अँड्रॉइड किंवा आयओएस आधारित भ्रमणध्वनीमध्ये हे ॲॅप इन्स्टॉल करावे आणि ॲॅपमध्ये देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सुचनांनुसार आपल्याच घराची पाहणी करून आवश्यक तिथे योग्य त्या सुधारणा तातडीने करवून घ्याव्यात, असे आवाहन महानगरपालिकेच्या किटकनाशक खात्याने केले आहे.
भ्रमणध्वनी ॲॅप उपयुक्त!
डेंग्यू हा एक प्राणघातक आजार आहे. या आजाराचा प्रसार ‘एडीस इजिप्टाय’ या डासांद्वारे होतो. या डासांच्या उत्पत्तीस प्रतिबंध करणे, हाच या आजाराचा मुकाबला करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
घर आणि सोसायट्यांच्या अंतर्गत स्तरावर सातत्याने काळजीपूर्वक पाहणी करणे, अत्यंत आवश्यक असते. ही पाहणी नक्की कशी करावी, त्यात कोणत्या बाबी पहाव्यात, याची माहिती नागरिकांना सहजपणे मिळावी, या उद्देशाने ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे भ्रमणध्वनी ॲॅप विकसित केले आहे.
या ठिकाणी उत्पत्ती स्थानांचा धोका!
सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डेंग्यू विषाणूवाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने पाण्याचे पिंप, फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे; घराच्या सज्जामध्ये (गॅलरी) किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या ताटल्या (प्लेट्स), वातानुकूलित यंत्रणा (एसी), शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे यांसारख्या विविध स्रोतांमध्ये अल्प प्रमाणात असलेल्या स्वच्छ पाण्यातदेखील या डासांची उत्पत्ती आढळून आली आहे.
काही दिवस अॅप बंदच
‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे अॅप मुंबईकरांसाठी उपयुक्त आहे. ऑक्टोबर महिन्यात हे अॅप मुंबईकरांच्या सेवेत आणण्यात आले. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हे अॅप काही दिवस बंद होते, तसेच ॲॅपचा व्हिडिओ कार्यान्वित होत नव्हता. परंतु अॅप पुन्हा अॅक्टिव्ह झाले असून घरात कुठे ‘एडिप्त’ डासांची उत्पत्ती होऊ शकते, हे अॅपद्वारे लक्षात येते. त्यामुळे घरातील एका व्यक्तीने तरी अॅप डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पालिकेच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे