मुंबई

‘ओव्हरहेड वायर’वर बांबू पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत; लोकलच्या एका मागोमाग एक रांगा, ऐन सकाळी प्रवाशांना रुळांवरून चालण्याची वेळ

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल कल्लोळ बुधवारीही सुरूच राहिला. माटुंगा रेल्वे स्थानकानजीक बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे बांबू अप, जलद मार्गाच्या ‘ओव्हरहेड वायर’वर बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली. तब्बल अर्धा ते पाऊण तासाहून अधिक वेळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने लोकलमधील प्रवाशांनी गाडीतून खाली उतरून रेल्वे रुळावरून चालत कार्यालय गाठले. या घटनेमुळे चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक गेल्या काही दिवसांपासून विस्कळीतच आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असतानाच बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या शेडचा बांबू जलद मार्गावरील ‘ओव्हरहेड वायर’वर पडला. त्यामुळे मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली. या एका घटनेमुळे लोकलच्या एका मागोमाग एक रांगा लागल्या होत्या. तब्बल अर्धा तास जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून चालविण्यात येत होत्या. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

लोकल ठप्प झाल्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा प्रमुख स्थानकांवरील रेल्वे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. ‘ओव्हरहेड वायर’वरील बांबू साडेआठ वाजता हटवल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दुपारपर्यंत लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. सकाळी ही घटना घडल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेचा पुढील तपास आरपीएफ करत आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त