मुंबई : बेस्टच्या वांद्रे येथील बस थांब्यावर चक्क एका व्यावसायिक कंपनीने आपल्या उत्पादनांचे दुकान थाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रवाशांसाठी असलेल्या बस थांब्यावर दुकान उघडल्याने प्रवाशांना भर उन्हाळ्यात बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
संबंधित अनधिकृत व्यावसायिक वापराची तातडीने पाहणी करून कारवाई करावी, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनचे ट्रस्टी निकोलस आल्मेडा आणि ॲड. गॉडफ्री पिमेंटा यांनी बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांच्याकडे केली आहे.
बस थांबा हा प्रवाशांच्या प्रतिक्षेसाठी, बसची वाट पाहण्यासाठी, ऊन-पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी असताना त्याचा व्यावसायिक वापर होत असल्यास प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी रस्त्यावर उभे राहावे लागत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वांद्रे येथील हिल रोडवर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा गॉडफ्री पिमेंटा यांनी केला आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी राखीव सुविधेचा व्यावसायिक वापर होणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
दंडात्मक कारवाई करा!
अनधिकृत व्यावसायिक बांधकाम अथवा अतिक्रमण आढळल्यास ते तातडीने हटवून बसथांबा पूर्ववत प्रवाशांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावा तसेच सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.