Mumbai : बेस्ट ताफ्यात १,७०० मिडीबस; अपघात रोखण्यासाठी चालकांवर कॅमेऱ्याची नजर, परिवहन विभाग १,५१८ कोटींनी तोट्यात 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : बेस्ट ताफ्यात १,७०० मिडीबस; अपघात रोखण्यासाठी चालकांवर कॅमेऱ्याची नजर, परिवहन विभाग १,५१८ कोटींनी तोट्यात

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासह प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे. यासाठी बसताफा वाढवण्यासह आधुनिक एकात्मिक परिवहन व्यवस्थापन प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासह प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे. यासाठी बसताफा वाढवण्यासह आधुनिक एकात्मिक परिवहन व्यवस्थापन प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत प्रवाशांसाठी १,७०० मिडी एसी बस उपलब्ध करण्यात येणार आहे तसेच अपघात टाळण्यासह बस चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. अपघात रोखणे, बससेवेचे रिअल-टाइम निरीक्षण आणि प्रवाशांना अचूक माहिती उपलब्ध करून देण्यावर २०२७-२८च्या अर्थसंकल्पीय अंदाजात भर देण्यात आला आहे.

बेस्ट उपक्रमाचा २०२७-२८चा अर्थसंकल्प बुधवारी बेस्ट समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. बेस्टच्या महाव्यवस्थापकांचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला.

यंदाही बेस्टचा अर्थसंकल्प तुटीचा असून एकूण १,३१७ कोटी रुपयांची तूट अपेक्षित आहे. त्यापैकी परिवहन विभागाला १,५१८ कोटी ७१ लाख रुपयांचा तोटा असून विद्युत विभागाकडून २०१ कोटी २१ लाख रुपयांची शिल्लक अपेक्षित आहे. भांडवली खर्चासाठी ६४७ कोटी ७९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

१० हजार बसगाड्यांचे उद्दिष्ट

सप्टेंबर २०२६ अखेर बेस्टच्या ताफ्यात २,८३४ बस होत्या. भविष्यात टप्प्याटप्प्याने ४,०१६ बसगाड्या ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन आहे. पीएम-ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून १,५०० मिडी बस मिळणार असून २०० मिडी सीएनजी बससाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणून बेस्टचा बसताफा १० हजारांपर्यंत नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चालकांवर कॅमेऱ्याची नजर

अपघात रोखण्यासाठी बस चालवताना चालकाच्या हालचाली टिपणारे कॅमेरे बसमध्ये बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांचे निरीक्षण केंद्रीय कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून केले जाईल.

दिंडोशी येथील प्रशिक्षण केंद्रात अत्याधुनिक बस ड्रायव्हिंग सिम्युलेटर बसवण्याचे नियोजन आहे. यामुळे प्रत्यक्ष धोका न पत्करता चालकांना अपघातजन्य परिस्थिती, पावसाळ्यातील अवघड वाहनचालन आणि इंधन कार्यक्षमतेबाबत प्रशिक्षण देता येणार आहे.

वीज वितरण व्यवस्था होणार अधिक सक्षम

बेस्टच्या विद्युत विभागाच्या माध्यमातून केंद्राच्या आरडीएसएस योजनेंतर्गत वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्याची कामे प्रस्तावित आहेत. ३३ केव्ही ऊर्जा रोहित्रांची क्षमता वाढविणे, जुने सर्किट ब्रेकर बदलणे, वीज वितरण उपकेंद्रांमध्ये सुधारणा करणे, नवीन केबल टाकणे आणि नवीन उपकेंद्रे उभारण्याचा समावेश आहे. याशिवाय ॲडव्हान्स्ड डिस्ट्रिब्युशन मॅनेजमेंट सिस्टीम लागू करून वीजपुरवठ्यावर अधिक प्रभावी देखरेख ठेवण्याचे नियोजन आहे.

मुंबई दर्शनासाठी छतविरहित डबल डेकर

मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हेरिटेज आणि हॉप-ऑन हॉप-ऑफ सेवेसाठी छतविरहित डबल डेकर बस ताफ्यात दाखल करण्याची योजना आहे. या बसमधून पर्यटकांना मुंबईतील ऐतिहासिक स्थळे, वारसा वास्तू आणि पर्यटनस्थळांचा अनुभव घेता येणार आहे.

मोबाइलवरून बसचे ट्रॅकिंग

एकात्मिक परिवहन व्यवस्थापन प्रणालीमुळे बससेवेचे रिअल-टाइम निरीक्षण, मार्ग व वेळापत्रकाचे व्यवस्थापन आणि प्रवाशांना बसचे अचूक आगमन-प्रस्थान वेळ समजणे शक्य होणार आहे. मोबाइल अॅपद्वारे बस ट्रॅकिंग, मार्गांची माहिती, प्रवासाचे नियोजन आणि सेवा सूचनाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गर्दीच्या मार्गांवर बससेवा वाढविण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

महागाई आणखी वाढणार; चालू आर्थिक वर्षात दर ५.२ टक्क्यांवर जाणार

पुणे-नांदेडमधील 'महाज्योती' व 'वनार्टी'ची परीक्षा ऐनवेळी रद्द; केंद्रावर तांत्रिक गोंधळ, विद्यार्थ्यांचा संताप

...तर ती 'आयात' नाही; रशियन नागरिकाला Thar परत करण्याचे कोर्टाचे आदेश

फडणवीसांच्या भेटीची कंत्राटदारांची मागणी; ८६ हजार कोटींची बिले थकीत