गिरीश चित्रे / मुंबई
मुंबई उपनगरीय रेल्वेनंतर मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन म्हणून बेस्टची ओळख. सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी आजही बेस्ट बसेसना पसंती देतात. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट बसच्या अपघातात वाढ झाली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत बेस्ट बसेसच्या अपघातात तब्बल ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ आतापर्यंत बेस्टचे एकूण ७२ अपघात झाले असून यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून ५५ गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन असलेली बेस्ट प्रवाशांसह पादचाऱ्यांसाठी काळ ठरतेय.
दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेला बेस्ट उपक्रमाने प्राधान्य दिले पाहिजे. तसेच प्रवाशांनाही रस्त्यावरून ये-जा करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन प्रवासी संघटनांनी केले आहे.
सर्वात स्वस्त व सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी आजही बेस्ट बसेसना पसंती देतात. बेस्ट उपक्रमाच्या २ हजार ७४४ बसेसच्या माध्यमातून दररोज २५ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या गारेगार व पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक एसी बसेसचा समावेश ताफ्यात करण्यास सुरुवात केली.
मात्र भाडेतत्त्वावरील बसेसच्या अपघातात वाढ झाली असून कधी दुभाजकाला धडक, दुसऱ्या वाहनाला धडक, पादचाऱ्यांना धडक तर कधी आगीत स्वाहा अशा घटना घडत आहेत. त्यामुळे मुंबईची दुसरी लाइफलाइन पादचारी, प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.
१४ कोटी १८ लाखांची भरपाई दिली!
जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये एकूण १२ अपघात प्रकरणांमध्ये तसेच जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये एकूण २२ अपघात प्रकरणांमध्ये बेस्ट उपक्रमाकडून मृतांच्या वारसांना अनुक्रमे ८,९२,९७,०४३ व ५,२५,५५,७५१ इतकी आर्थिक भरपाई देण्यात आलेली आहे.
अशी होते कारवाई!
बेस्ट उपक्रमाच्या अपघातग्रस्त बस गाड्यांवर कार्यरत असलेल्या बसचालकांना आरोपपत्र देऊन आरोप त्यांच्याविरुद्ध निर्विवादपणे सिद्ध झाल्यास उपक्रमाच्या प्रचलित नियमानुसार कारवाई करण्यात येते. तसेच भाडेतत्त्वावर बसगाडीचा अपघाताप्रकरणी संबंधित कंत्राटदार बसचालकाने केल्यास व त्याच्याविरुद्धचा आरोप निर्विवाद सिद्ध झाल्यास त्या बसचालकास नोकरीतून ‘बडतर्फ’ करण्याचा आदेश दिला जातो, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.
दाव्यानुसार आर्थिक नुकसानभरपाई
‘बेस्ट’ अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीने बस आगारातून बस निरीक्षक, अपघात निरीक्षक यांना घटनास्थळी त्वरित जखमीची मदत करण्यासाठी पाठवण्यात येते. जखमींची परिस्थिती गंभीर असल्यास जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात येते. मृतांना दाव्यानुसार ‘बेस्ट’कडून आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते.