मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमात आता कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. बेस्ट उपक्रमात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या २५ हजार ५६२ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र पुढील दोन वर्षांत २५ हजार कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात बेस्ट उपक्रमाची कोंडी वाढतच जाणार आहे.
अखंडित वीजपुरवठा व सुरक्षित प्रवास यासाठी आजही नागरिक आणि प्रवासी बेस्ट उपक्रमाच्या परिवहन व विद्युत विभागाला पसंती देतात. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली आहे. बेस्ट उपक्रमावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. परिवहन विभागाची अवस्था बिकट झाली आहे. गेली काही वर्षे विद्युत विभागाच्या माध्यमातून बेस्ट परिवहन विभागाचा गाडा हाकला जात होता. मात्र स्पर्धक निर्माण झाल्याने बेस्टच्या विद्युत विभागाची कोंडी झाली आहे. परिवहन व विद्युत विभागाचा गाडा हाकणारे अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने कर्मचाऱ्यांचाही तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यातच पुढील दोन वर्षांत २५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे भविष्यात बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासणार आहे.
कर्मचाऱ्यांची ५७८.९८ कोटींची देणी!
सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रॅच्युइटीसह अन्य मिळणारे भत्ते हे कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे असतात. मात्र सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना ग्रॅच्युइटीसह अन्य भत्ते मिळवण्यासाठी बेस्ट उपक्रमाचा उंबरठा झिजवावा लगतो. सद्यस्थितीत बेस्ट उपक्रमाला शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ५७८.९८ कोटी रुपये देणे आहे.