मुंबई : पालिका रुग्णालयात पावसाळ्यातील साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मात्र लक्षणीय वाढ होत आहे. एकट्या मुंबईत डेंग्यूचे चार हजारांहून अधिक रुग्ण आहेत. पालिका रुग्णालयांत २९ टक्के रुग्ण डेंग्यूचे उपचार घेत आहेत. दरम्यान डेंग्यूंचा वाढता धोका पाहता मुंबईकरांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवत असला तरीही डेंग्यूच्या डासांवर नियंत्रण मिळवता आले नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी पालिकेला २२ केंद्रांवरून पावसाळी आजारांचे अहवाल प्राप्त व्हायचे. मात्र, आता या केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून एकूण ८८० केंद्र नव्याने सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांतून मिळालेल्या माहितीनुसार अन्य आजारांच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मागील दहा महिन्यांपासून वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाने केल्या आहेत. तसेच डेंग्यू रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवत आहे.
असा पसरतो डेंग्यू
डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती या प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत ठरत असतात. या आजारात तापामुळे काही जणांना हाडे आणि स्नायूत खूप वेदना जाणवतात. त्यासोबत डोकेदुखी, मळमळ, अंगावर लाल पुरळ येणे, अशी लक्षणे दिसू शकतात. या आजरात रुग्णाला त्याची लक्षणे पाहून औषधे दिली जातात. जर रुग्णाची प्रकृती गंभीर असेल, तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.
२५ जणांनी गमावला जीव
जानेवारी २०२४ पासून ऑक्टोबर २०२४ पर्यंत २५ रुग्णांना डेंग्यूमुळे जीव गमवावा लागला आहे. यामध्ये विविध वयोगटाच्या रुग्णांचा समावेश आहे.
ऑक्टोबरपर्यंत ४८१४ रुग्णांवर उपचार
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसते. गेल्या वर्षी २०२३ मध्ये एकूण ५४७६ रुग्णांची नोंद पालिकेकडे झाली होती, तर यंदा जानेवारी महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत ४८१४ रुग्णांवर उपचार केल्याची माहिती समोर आली आहे.
डेंग्यूच्या डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून शर्थीने प्रयत्न सुरू असून आता डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.
- डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी,मुंबई पालिका