मुंबई

Bhandup BEST Bus Accident : हँडब्रेक सोडताच बस धडकल्याचा चालकाचा दावा; ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

‘एफआयआर’नुसार, २९ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ९.३० वाजता गजबजलेल्या भांडुप स्टेशन रोडवर हा अपघात झाला. बेस्ट मार्ग क्रमांक ६०६ वरील इलेक्ट्रिक एसी बस (एमएच-०१ सीव्ही ६५१५) चालकाने ताबा घेतल्यानंतर काही क्षणांतच नियंत्रणाबाहेर गेली आणि बसथांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना...

Swapnil S

अवधूत खराडे/मुंबई

भांडुप स्टेशन रोडवर बेस्टच्या ‘वेट-लीज’वर चालणाऱ्या विद्युत एसी बसचा भीषण अपघात होऊन मंगळवारी रात्री चार जणांचा मृत्यू झाला, तर किमान ११ जण गंभीर जखमी झाले. अटक करण्यात आलेल्या बसचालक संतोष रमेश सावंत (५२) याने पोलीस चौकशीत दावा केला की, तो चालकाच्या सीटवर बसला तेव्हा बस आधीच सुरू होती आणि हँडब्रेक सोडताच ती अचानक पुढे झेपावली, त्यामुळे हा अपघात घडला.

भांडुप पोलिसांनी सावंत याला अटक करून भारतीय न्याय संहिता कलम १०५, ११०, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक न्यायालयाने त्याला ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

‘एफआयआर’नुसार, २९ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ९.३० वाजता गजबजलेल्या भांडुप स्टेशन रोडवर हा अपघात झाला. बेस्ट मार्ग क्रमांक ६०६ वरील इलेक्ट्रिक एसी बस (एमएच-०१ सीव्ही ६५१५) चालकाने ताबा घेतल्यानंतर काही क्षणांतच नियंत्रणाबाहेर गेली. बसथांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या रांगेत आणि पादचाऱ्यांमध्ये घुसून बस खांबावर आदळली आणि तेथेच थांबली. या धडकेत प्रणिता संदीप रासम (३५), मानसी मेघश्याम गुरव (४९), वर्षा सावंत (२५) आणि प्रशांत दत्तू शिंदे (४५) यांचा मृत्यू झाला. आणखी ११ जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय, मुलुंडमधील एम. टी. अग्रवाल रुग्णालय आणि फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उर्वरित जखमींवर सध्या उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सावंत २००८ पासून बेस्टमध्ये चालक म्हणून कार्यरत असून तो कायमस्वरूपी कर्मचारी आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने इलेक्ट्रिक बस चालवायला सुरुवात केली होती. अपघाताच्या दिवशी तो रात्रीच्या ड्युटीवर हजर झाला होता आणि त्याला मार्ग क्रमांक ६०६ची बस देण्यात आली होती. हँडब्रेक सोडताच बस अनियंत्रितपणे पुढे गेल्याचे त्याचे म्हणणे आहे.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले. तर बेस्ट उपक्रमाकडून दोन लाख रुपयाची मदत दिली जाणार आहे. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्चही दिला जाणार आहे.

पवईत बेस्ट बसला दुचाकीची धडक

पवईत मंगळवारी ३०७ नंबरची बस मजास आगार ते वैशाली नगर येथे जात असताना आयआयटी पवई नाका येथे एक दुचाकी समोरुन आली आणि बेस्टला धडकली. यात दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेली व्यक्ती किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगाकडून BMC निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती; इक्बाल सिंग चहल यांच्यावर मोठी जबाबदारी

"ही तर इच्छाधारी मेट्रो..." ; एकता कपूरच्या Naagin 7 चं हटके प्रमोशन, व्हायरल Videoवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

BMC Election 2026 : भाजपकडून १३६ उमेदवार निश्चित; कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार, वाचा सविस्तर

धावत्या व्हॅनमध्ये तरुणीवर गँगरेप; लिफ्टच्या बहाण्याने गाडीत बसवलं अन्...

३१ डिसेंबरची हाऊस पार्टी फ्लॉप? 'या' होम डिलिव्हरी ॲप्सचे कामगार संपावर; तुमच्या शहरात डिलिव्हरी चालू की बंद? जाणून घ्या सविस्तर