मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सभागृहाचे कामकाज रेटून नेतात, अशी टीका करत भास्कर जाधव यांनी अध्यक्षांकडे बघत हातवारे केल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी सभागृहात केला होता. तसेच भास्कर जाधव यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी केली होती. मात्र शुक्रवारी सभागृहात भास्कर जाधव यांनी केलेल्या विधानावरून माफी मागितली.
राईट टू रिप्लाय हा सभागृहातील विरोधी पक्षाचा अधिकार आहे. मात्र राईट टू रिप्लाय अंतर्गत विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच भास्कर जाधव यांनी विधी मंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी विधानसभा अध्यक्ष कामकाज रेटून नेतात, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. हाच धागा पकडून मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. भास्कर जाधव यांनी माफी मागावी नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देसाई यांनी यावेळी अध्यक्षांकडे केली.
मी या ठिकाणी सभागृह जेव्हा नियमाने चालावे असा आग्रह धरतो, तेव्हा माझ्याकडून अशी चूक होता कामा नये असे मला वाटते, असे सांगत भास्कर जाधव यांनी सभागृहात माफी मागितली.
भास्कर जाधव यांचे वर्तन म्हणजे अध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान आहे. तसेच सभागृहाचा अवमान होतो. त्यामुळे यापुढे कुठल्याही सदस्यांकडून असे वर्तन होणार नाही, अशी अपेक्षा करतो. भास्कर जाधव यांनी सभागृहात माफी मागितली असून आता हे प्रकरण थांबवा.राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष