मुंबई : ४० वर्षे मी राजकारणात असून राजकारण मला कोणी शिकवू नये, लाथ मारेन तिथे पाणी काढायची धमक आहे, असे भावनिक पत्र ठाकरेंच्या शिवसेनेचे गुहागर येथील आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना लिहिले आहे.
राजकारण करायला मला कोणी शिकवण्याची गरज नाही. ४० वर्षे मी याच क्षेत्रात आहे. एक गेला तर चार निर्माण करेन, असा इशारा भास्कर जाधव यांनी पत्रातून दिला आहे. मी आक्रमक असलो तरी अत्यंत संवेदनशील आहे. जे गेलेत ते आता बाकी सर्वांना फोन करून आम्ही विकासासाठी गेलो आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असे सांगत आहेत, असा उलगडा जाधव यांनी पत्रातून केला आहे.
भास्कर जाधव यांच्यावर आमचा राग नाही, मतदारसंघाचा व आमच्या भागाचा विकास हा भास्कर जाधव यांनीच केला, कोट्यवधीचा निधी हा भास्कररावांच्या माध्यमातूनच आला...’ ही वाक्य व ही भाषा आहे गेल्या काही दिवसांत पक्ष सोडून गेलेल्या लोकांची, आणि मग जाण्याचे कारण काय सांगतात तर आम्हाला सत्तेत जायचे आहे, आम्हाला विकास करून घ्यायचा आहे. व्वा ! मला हा विषय तुम्हा सर्वांशी बोलावासा वाटला, कारण मी स्वतः संभ्रमात आहे. ज्या विकासाचे कारण देऊन तुम्ही अन्य पक्षात गेल्याचे स्वतःचे समर्थन करताय म्हणजेच स्वतःशी खोटे बोलून जनतेची फसवणूक करत आहात, यांची विकासाची नक्की व्याख्या काय? स्पष्टपणे एखाद्या विशिष्ट कामाचा उल्लेख यांच्याकडून ऐकलात का आपण?, धादांत खोटे बोलून केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी हा पक्षप्रवेश झाला आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.
ठाकरेंचा भगवा डौलाने फडकवत ठेवेन !
अजून माझी आमदारकीची चार वर्षे बाकी आहेत याची जाणीव स्वकीयांना नसली तरी विरोधकांना नक्की आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढायची माझ्यात धमक आहे आणि हो त्याउपर याबाबतीत तुमच्या मनात कसलीही शंका असेल तर थेट माझ्याशी बोला. अफवांवर विश्वास ठेऊ नका. तुम्हाला सोबत घेऊन आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवत ठेवेन याची खात्री देतो. लवकरच गावी आणि मुंबईला जाहीर मिळावे घेणार आहे. त्यावेळेला भेटू आणि खूप काही बोलू, असे भास्कर जाधव म्हणाले.