भाईंदरमध्ये ३०० कोटींचा घोटाळा? श्रीराम मंदिर जमिनीवर बेकायदा निवासी-वाणिज्यिक बांधकामे; १० जणांवर गुन्हा दाखल  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

भाईंदरमध्ये ३०० कोटींचा घोटाळा? श्रीराम मंदिर जमिनीवर बेकायदा निवासी-वाणिज्यिक बांधकामे; १० जणांवर गुन्हा दाखल

काशिमीरा येथील प्रसिद्ध शांती गार्डन परिसरात श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या मालकीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनीवर कथितरीत्या बेकायदा बांधकामे करून सदनिका आणि दुकानांची विक्री केल्याचा ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा कथित घोटाळा उघडकीस आला आहे.

Swapnil S

भाईंंदर : काशिमीरा येथील प्रसिद्ध शांती गार्डन परिसरात श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या मालकीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनीवर कथितरीत्या बेकायदा बांधकामे करून सदनिका आणि दुकानांची विक्री केल्याचा ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा कथित घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रे, अनोंदणीकृत करार, मुद्रांक शुल्काची चोरी आणि शासकीय सवलतींचा गैरवापर करून शासन, म्हाडा तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रामनगर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे भागीदार, श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टचे तत्कालीन विश्वस्त आणि इतर संबंधित अशा एकूण १० जणांविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे मिरे येथील सर्व्हे क्रमांक १४६, १४८, १४९, १५०, १५१ व १५२(१) (नवीन सर्व्हे क्रमांक १७ ते २३(१)) या जमिनीवर हा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. सुमारे ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या जमिनीबाबत १ मार्च १९७९ ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीतील व्यवहार आणि कागदपत्रांच्या आधारे गैरव्यवहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टचे तत्कालीन विश्वस्त, रामनगर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे तत्कालीन व विद्यमान भागीदार, वकील आणि इतर संबंधितांनी संगनमत करून हा कट रचल्याचा आरोप आहे. तत्कालीन विश्वस्त नंदलाल अग्रवाल यांचे निधन झालेले असतानाही त्यांच्या नावाने ट्रस्टच्या वतीने अकृषिक (एन.ए.) परवानग्या आणि अन्य मंजुरी मिळवण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच ट्रस्टसोबत अनोंदणीकृत करार करून मुद्रांक शुल्क न भरता, एकाच स्वरूपाच्या करारांमध्ये वेगवेगळ्या तारखा दाखवून व्यवहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीवर मोठ्या प्रमाणात निवासी आणि व्यावसायिक बांधकामे करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टला कोणताही मोबदला न देता तसेच तत्कालीन यूएलसी सवलतींच्या अटींचे उल्लंघन करून जमिनीचा परस्पर अपहार केल्याचा आरोप आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सवलतीच्या दरात घरे उपलब्ध करून देणे, तसेच शासन, म्हाडा आणि महापालिकेला नियमानुसार घरे विनामूल्य हस्तांतरित करणे या अटींचे पालन न करता सदनिका व दुकानांची विक्री करून आर्थिक फायदा मिळवण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यातून शासन आणि नागरिकांची ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

भाईंदर पूर्व येथील व्यावसायिक प्राचीन रमेश कोठारी (३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काशिमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टचे संबंधित विश्वस्त, रामनगर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे भागीदार तसेच राकेश चौधरी, मुकेश चौधरी, कैलास जैन, रमेश शाह, भरत शाह, प्राची देसाई, दालचंद चौधरी आणि रशेश शाह यांच्यासह एकूण १० जणांचा समावेश आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे, नोंदणी अधिनियम आणि महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्य समोर आणण्याचे आव्हान

यूएलसीच्या अटी लागू असतानाही आणि या प्रकरणी तक्रारी करण्यात आल्याचा दावा असतानाही मीरा-भाईंदर महानगरपालिकेने संबंधित बांधकामांना सातत्याने परवानग्या दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष-३ कडून सुरू आहे. देवस्थानाच्या मालकीच्या जमिनीचे व्यवहार, कथित बनावट कागदपत्रे, शासकीय सवलतींचा वापर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या घरांचे नेमके काय झाले, याचा तपास निष्पक्षपणे होणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणातील सर्व आरोपांची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai: नियम पाळले जात असल्याची खात्री करा! बांधकाम ध्वनिप्रदूषणासंदर्भात पालिकेला निर्देश

Mumbai: जीएलएमआरसह तीन प्रकल्पांसाठी झाडांचा बळी; ११ झाडांचे पुनर्रोपण प्रस्तावित, नागरिकांना सात दिवसांत हरकती सूचना नोंदवा

ट्रम्प करतात मोदींना नियंत्रित; राहुल गांधींनी केला दावा, पुन्हा दिले चर्चेचे आव्हान

लासलगाव बाजार समितीत मक्याला दहा वर्षांतील उच्चांकी भाव; प्रतिक्विंटल ३ हजारांचा टप्पा पार!

दंड थकवणाऱ्यांना 'अभय'; दंडावर २० टक्के सवलत, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय