Bhayandar : न्यायालयाची स्थगिती असतानाही बांधकाम; भाजप आमदाराच्या कंपनीवरून वाद, विधी अधिकाऱ्यांसह चौघांना आयुक्तांची नोटीस (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Bhayandar : न्यायालयाची स्थगिती असतानाही बांधकाम; भाजप आमदाराच्या कंपनीवरून वाद, विधी अधिकाऱ्यांसह चौघांना आयुक्तांची नोटीस

न्यायालयाचा स्थगिती आदेश लागू असतानाही भाईंदरमधील मौजे नवघर येथील वादग्रस्त जमिनीवर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित कंपनीला महापालिकेने बांधकाम परवानग्या दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Swapnil S

भाईंंदर : न्यायालयाचा स्थगिती आदेश लागू असतानाही भाईंदरमधील मौजे नवघर येथील वादग्रस्त जमिनीवर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित कंपनीला महापालिकेने बांधकाम परवानग्या दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी विधी अधिकारी, संबंधित विकासक, वास्तुविशारद आणि कनिष्ठ अभियंता अशा चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

संबंधित जमिनीबाबत न्यायालयाने २०२४ मध्ये स्थगिती आदेश दिला होता. मात्र, हा आदेश अस्तित्वात असतानाच महापालिकेच्या नगररचना विभागाने विकासकाला बांधकाम परवानगीसाठी एलओआय आणि सीसी दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी दोन महिन्यांपूर्वी आयुक्तांना चौकशीचे निर्देश दिले होते. तसेच शासनाच्या वकिलांकडून कायदेशीर अभिप्राय घेण्यास सांगितले होते.

सोमवारी सरनाईक यांनी महापालिकेच्या नगररचना विभागात बैठक घेऊन प्रकरणाचा आढावा घेतला. संबंधित ‘सेव्हन इलेव्हन’ ही विकासक कंपनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जमिनीची नोंदणी मेहता यांच्या मुलाच्या नावावर असल्याची माहितीही त्यांनी बैठकीत दिली.

महापालिकेच्या विधी विभागाच्या अभिप्रायाच्या आधारे नगररचना विभागाने बांधकाम परवानग्या दिल्याचे समोर आले आहे.

मात्र, न्यायालयाचा स्थगिती आदेश लागू असताना अशा परवानग्या देणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे वरिष्ठ विधिज्ञ ॲड. रामचंद्र आपटे यांनी अभिप्रायात नमूद केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे परवानग्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परवानग्यांबाबत अंतिम निर्णय सुनावणीनंतर

आयुक्तांनी संबंधित चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. सुनावणीनंतर बांधकाम परवानग्यांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त आणि नगररचना विभागाची दिशाभूल करून परवानग्या मिळवण्यात आल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही परवानग्या कोणत्या आधारावर देण्यात आल्या आणि या प्रकरणात कोणाची जबाबदारी निश्चित होते, याकडे आता भाईंदरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव

हाय फॅट, साखर, मिठाची स्वतंत्र इशारा चिन्हे अनिवार्य; पाकीटबंद खाद्यपदार्थांबाबत सुप्रीम कार्टाचा आदेश

वॉशिंग सेंटर : पाणी वापरावर बंदी; पिण्याचे पाणी न वापरण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव, गृहनिर्माण सोसायट्यांवरही निर्बंधांची शक्यता

कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त

Navi Mumbai : तुर्भे रेल्वे उड्डाणपूल चार महिने वाहतुकीसाठी बंद; ३१ मार्चपर्यंत वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग