दिल्लीतील 'बिहार भवन'च्या धर्तीवर बिहार सरकार आता मुंबईतही 'बिहार भवन' उभारणार आहे. त्यासाठी जागेची निश्चिती झाली असून बजेटही ठरले आहे. प्रशासकीय कामे आणि जनकल्याणाला चालना देण्याच्या उद्देशाने ३० मजली बिहार भवन उभारण्यात येणार आहे.
जागा ठरली, ३१४ कोटी २० लाख मंजूर
बिहार सरकारच्या बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बिहार भवन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एल्फिन्स्टन इस्टेट परिसरात उभारले जाणार आहे. सुमारे ३० मजली (तळमजल्यासह) इमारत असून, ती अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला ३१४ कोटी २० लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळणार असल्याचे कुमार रवी यांनी सांगितले.
२४० बेडची डॉरमेटरी, १७८ रूम्स, कॅफेटेरिया...अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज
“या इमारतीत सरकारी कामकाज, बैठका आणि निवासासाठी सुविधा असतील. विशेषतः कर्करोग उपचारासाठी बिहारमधून मुंबईत येणाऱ्या नागरिकांसाठी खास व्यवस्था करण्यात येईल,” असे अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सुमारे ०.६८ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या बिहार भवनाची उंची सुमारे ६९ मीटर असेल. बहुमजली इमारतीत एकूण १७८ रूम असतील, तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी २४० बेडची क्षमता असलेली डॉरमेटरी असेल. याशिवाय, सेन्सर-आधारित स्मार्ट ट्रिपल किंवा डबल-डेकर पार्किंगची सुविधा असून, एकाच वेळी २३३ वाहनांचे पार्किंग करता येणार आहे. इमारतीत कॉन्फरन्स हॉल (७२ आसनक्षमता), कॅफेटेरिया, वैद्यकीय कक्ष आणि अन्य आवश्यक सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत.
मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय हा राज्याच्या प्रगतीसाठी आणि लोककल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. मुंबईतील बिहारच्या रहिवाशांसाठी सुविधा सुधारण्याच्या दिशेने आणि बिहारच्या बाहेर राज्याची प्रशासकीय उपस्थिती मजबूत करण्याच्या दिशेने हा प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.