मुंबई

म्हाडाच्या मास्टर लिस्ट लॉटरीतील ५६ फाईलींचे बिंग फुटले, पात्र केलेल्या ५६ फाईली अपात्र; कोट्यवधीच्या घोटाळ्याची शक्यता

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट) ५६ घरांच्या फाईलचे बिंग फुटले आहे.

तेजस वाघमारे

मुंबई: म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट) ५६ घरांच्या फाईलचे बिंग फुटले आहे. मास्टर लिस्ट समितीने पात्र ठरविलेल्या अर्जदारांना घरांचे वाटप करण्यासाठी मंडळाने लॉटरीही काढली. ऑनलाईन घर वाटप झालेल्या अर्जदारांच्या कागदपत्रांच्या फेरपडताळणीसाठी मंडळाने अर्जदारांकडून कागदपत्रे मागविली. मात्र कागदपत्र सादर करण्याकडे ५६ पात्र अर्जदारांनी पाठ फिरविल्याने मंडळाने त्यांना अपात्र ठरविले आहे. हा कोट्यावधींचा घोटाळा असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी म्हाडातील वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

दक्षिण मुंबईतील धोकादायक उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत तात्पुरते संक्रमण शिबीर उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार मंडळाने हजारो नागरिकांची पर्यायी वास्तव्याची व्यवस्था संक्रमण शिबिरात करून दिली आहे. जागेअभावी किंवा इतर कारणांनी मूळ इमारतीचे बांधकाम होत नसल्याने अशा इमारतींमधील रहिवाशांना मंडळ मास्टरलिस्ट मार्फत घरे उपलब्ध करून देते.

उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळणारी घरे मास्टर लिस्टच्या माध्यमातून देण्यात येतात. मात्र यामध्ये दलाल आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे यापूर्वीही निदर्शनास आले होते. त्यामुळे गृहनिर्माण विभागाने मास्टर लिस्टला स्थगिती दिली होती. राज्यात सत्तापालट होताच गृहनिर्माण विभागाने मास्टर लिस्टवरील स्थगिती उठवली.

यानंतर मंडळाने जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना घरे देण्यासाठी नागरिकांकडून अर्ज मागविले होते. नागरिकांनी केलेल्या अर्जाची पात्रता निश्चिती झाल्यानंतर २६५ पात्र रहिवाशांना घर वाटप करण्यासाठी मंडळातर्फे पहिल्यांदा २८ डिसेंबर २०२३ रोजी संगणकीय लॉटरी काढण्यात आली. मात्र लॉटरीतील अर्जदारांच्या कागदपत्रांची फेरपडताळणी करण्याची मागणी करण्यात आली. मंडळाने लॉटरीतील अर्जदारांकडून पात्रतेसाठी पुन्हा कागदपत्रे मागवली. मात्र ५६ नागरिकांकडून प्रतिसाद मिळू शकला नाही, असे सूत्रांकडून समजते.

१५८ पात्र अर्जदारांना देकारपत्र प्रदान

मास्टर लिस्टवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील ऑनलाईन गाळे वाटप झालेल्या १५८ पात्र अर्जदारांना नुकतेच राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते देकारपत्र प्रदान करण्यात आले आहे.

अनेक अर्जदारांचा हक्क संपुष्टात

मास्टर लिस्टच्या लॉटरीत गाळा वाटप झालेल्या अनेक अर्जदारांनी प्राप्त घर घेण्यास नकार दिला आहे. यामुळे अनेक अर्जदारांचा मास्टर लिस्टवरील हक्क संपुष्टात आला आहे.

२००० साली आणि त्यानंतर पात्र झालेल्या अर्जदारांचा घर वाटपाच्या ऑनलाईन लॉटरीत समावेश करण्यात आला होता. लॉटरीनंतर काही अर्जदारांकडून पात्रतेसाठी कागदपत्रे मागविण्यात आली होती. मात्र ५६ अर्जदारांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

- मिलिंद शंभरकर, मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी