File Photo
File Photo ANI
मुंबई

भाजपचे ‘मिशन ४५’ ; लोकसभेसाठी महाराष्ट्रात जय्यत तयारी - देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप दोन वर्षे बाकी असतानाच भाजपचे महाराष्ट्रात ‘मिशन ४५’ सुरू झाले आहे. शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या १८ मतदारसंघांवर भाजपचे विशेष लक्ष असणार आहे. यादृष्टीने लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देहू येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोणताही अवमान झालेला नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजितदादांना अतिशय प्रेमाने वागविले. हे काही लोकांना पाहवले नाही. हे अजितदादांच्या विरोधातील षडयंत्र आहे, असेही फडणवीस म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी भाजपने त्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने यासाठी एक आढावा बैठक गुरुवारी आयोजित केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले की, राज्यातील १७ ते १८ जागांवर जास्त लक्ष देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रातून विनोद तावडे तर राज्यातून चंद्रशेखर बावनकुळे समन्वय साधणार आहेत. या १६ मतदारसंघांत केंद्रीय मंत्र्यांचे दौरेही होणार आहेत. केंद्राच्या योजना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येतील.

काँग्रेसचे आंदोलनच चुकीचे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात सुरू असलेले काँग्रेसचे आंदोलनच चुकीचे आहे. स्वातंत्र्यसैनिकांची संपत्ती आपल्या नावावर केल्याबद्दल ही चौकशी सुरू आहे. ही संपत्ती गांधी परिवाराच्या ताब्यात गेली. हे प्रकरण न्यायालयात असून तपास संस्था त्याची चौकशी करत आहेत, असेही ते म्हणाले.

‘एमआयएम’ ही शिवसेनेची ‘बी’ टीम

एमआयएमने शिवसेनेला मतदान केल्याने ‘एमआयएम’ ही शिवसेनेची ‘बी’ टीम असल्याचे सिद्ध झाले आहे. खा. इम्तियाज जलील हे उघडे पडले आहेत. त्यामुळे शिवसेनेला जे सोयीचे ठरते तीच भूमिका ‘एमआयएम’ घेते हे आता स्पष्ट झाले असल्याचेही फडणवीस म्हणाले.

अजितदादांच्या विरोधात षडयंत्र!

देहूतील कार्यक्रम अतिशय चांगला पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी अतिशय सौहार्दपूर्ण वर्तन ठेवले. अजितदादांचे नाव भाषणासाठी घेतले नाही तेव्हा स्वत: पंतप्रधानच बोलले की अजितदादा बोला. मात्र, हे कोणाला तरी पाहवत नाही. याला जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अजितदादांच्या विरोधातीलच षडयंत्र असल्याचा दावा करताना फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छुपा सत्तासंघर्ष असल्याचे सूचित केले.

राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचा उमेदवार सहज जिंकेल!

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचा उमेदवार सहज जिंकून येईल हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्येतीचे कारण देत निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. त्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर