मुंबई : राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळावे, तुटवडा होऊ नये आणि अतिरिक्त रक्त वाया जाऊ नये यासाठी ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ हे धोरण अंमलात आणावे. हे धोरण तातडीने तयार करून सादर करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. तसेच रक्तपेढ्या स्थापन करणाऱ्या संस्थांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी नव्याने नियमावली तयार करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
आरोग्य भवनात राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव बेंद्रे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन तसेच विविध नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतली जातात. अशावेळी संकलित होणाऱ्या रक्ताला त्वरित मागणी नसल्यास रक्त वाया जाण्याची शक्यता निर्माण होते. परंतु उन्हाळ्यात व सणासुदीच्या काळात रक्तदान शिबिरांची संख्या घटल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतो. ही परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी नवीन धोरण उपयोगाचे ठरणार आहे.
राज्यातील शासकीय रक्तपेढ्यांमध्ये न्यूक्लिअरिक ॲसिड टेस्टिंग सुरू करण्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. नवी मुंबईतील खारघर येथील प्रशिक्षण केंद्र आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कार्यालय लवकर सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. - प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री