मुंबई : मुंबई मनपातंर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याबाबत मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लेखी निर्देश दिले आहेत.
आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात महापौर रितू तावडे यांनी नमूद केले आहे की, मनपातंर्गत सद्यस्थितीत एकूण १,४६१ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या स्वयंसेविका अत्यंत अल्प मानधनावर आरोग्य सेवा, लसीकरण मोहीम तसेच विविध शासकीय लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात.
दिवाळीत सानुग्रह अनुदान देण्याबाबत या आशा स्वयंसेविकांचा विचार न होणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या सर्व आशा स्वयंसेविकांना दीपावली सणानिमित्त प्रत्येकी ५,००० रुपयांचे सानुग्रह अनुदान तत्काळ मंजूर करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले.