Mumbai : पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जनगणनेचे काम; म्युनिसिपल मजदूर युनियनचा तीव्र विरोध  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जनगणनेचे काम; म्युनिसिपल मजदूर युनियनचा तीव्र विरोध

मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांना त्यांच्या नियमित कामासोबत जनगणनेच्या कामासाठी पाठवण्यात येत असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून या निर्णयाला म्युनिसिपल मजदूर युनियनने कडाडून विरोध केला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांना त्यांच्या नियमित कामासोबत जनगणनेच्या कामासाठी पाठवण्यात येत असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून या निर्णयाला म्युनिसिपल मजदूर युनियनने कडाडून विरोध केला आहे. नियमित कामानंतर त्यांना जनगणनेचे काम देऊ नये, असे युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी म्हटले आहे.

सध्या मुंबईत जनगणनेच्या नोंदणीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून, देशहिताचे हे काम असल्याची जाणीव संघटनेलाही आहे. मात्र, ऐन कडक उन्हाळ्यात महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून नियमित काम करून घेतल्यानंतर त्यांना जनगणनेच्या कामासाठी पाठविले जात असल्याने कामगार त्रस्त झाले आहेत, असे जाधव यांनी म्हटले आहे.

बहुसंख्य चतुर्थश्रेणी कामगार हे अल्पशिक्षित असून अनेकांकडे स्मार्टफोनही नाहीत. काही कर्मचारी केवळ साध्या की-पॅड फोनचा वापर करतात. त्यामुळे नागरिकांची माहिती ऑनलाइन नोंदवणे, ती वरिष्ठांकडे पाठवणे यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी कामगारांमध्ये संभ्रम आणि तणावाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.

कामगारांमध्ये संताप

सकाळपासून नियमित काम करून दुपारच्या उन्हात त्याच गणवेशात इमारती व टॉवरमध्ये जाऊन जनगणनेचे काम करावे लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिक अशा अवस्थेतील कर्मचाऱ्यांना घरातही प्रवेश देत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दुहेरी कामाच्या ओझ्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष असून आंदोलन उभे राहू शकते, असा इशाराही युनियनने दिला आहे.

जनगणनेच्या कामातून वगळावे!

पालिकेत सध्या ७५ हजारांहून अधिक पदे रिक्त असून, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर दुप्पट कामाचा ताण आहे. अशा परिस्थितीत जनगणनेची अतिरिक्त जबाबदारी दिल्यास नागरी सेवांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालिका आयुक्तांनी यात हस्तक्षेप करून कामगारांना जनगणनेच्या कामातून वगळावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

हे काम बेरोजगार युवकांना द्यावे!

जनगणनेचे काम सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना दिल्यास त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि काम अधिक परिणामकारकपणे पूर्ण होईल, असेही युनियनने म्हटले आहे. कडक उन्हाळा, कामगारांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सुट्ट्यांचा काळ लक्षात घेऊन सरकार व महापालिका प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन