मुंबई : तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांची २० मार्च रोजी बदली होताच सखोल स्वच्छता अभियान गुंडाळले, अशी बातमी दै. ‘नवशक्ति’ने २७ मार्च रोजी प्रसिद्ध केली होती. दै. ‘नवशक्ति’च्या बातमीची दखल घेत दोन आठवड्यांनंतर पुन्हा एकदा सखोल स्वच्छता अभियानास ऑपेरा हाऊस जंक्शन, चर्नी रोड स्थानक आदी ठिकाणांहून सुरुवात केली आहे. दरम्यान, सलग १६ आठवडे राबवण्यात आलेल्या सखोल स्वच्छता अभियानात १०२ मेट्रिक टन राडारोडा, ७० मेट्रिक टन कचरा, २५ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू गोळा करण्यात आल्या. सखोल स्वच्छता अभियानात १,५५५ कामगारांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी शनिवार, ६ एप्रिल रोजी व्यापक स्वरूपात सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राईव्ह) राबविण्यात आली. या विशेष मोहिमे अंतर्गत रस्ते-पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, राडारोडामुक्त परिसर, धोकादायक तारा यांचे जाळे हटवणे आदी कार्यवाही करण्यात आली. या मोहिमेत ६३४ किमी रस्त्यांची धुलाई केली. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेत विभाग पातळीवर व्यापक स्वरूपात कार्यवाही केली जात आहे.
१ हजार ५५५ कामगार-कर्मचाऱ्यांसह १७५ संयंत्राचे सहाय्य
सखोल स्वच्छता मोहिमेंतर्गत गत महिन्याभरात १०२ मेट्रिक टन राडारोडा, ७० मेट्रिक टन कचरा, २५ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तूंचे संकलन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ६३४ किलोमीटर लांबीचे रस्ते रस्ते ब्रशिंग करून पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले आहेत. १ हजार ५५५ कामगार- कर्मचाऱ्यांनी १७५ संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा गोळा करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी तब्बल १७५ वाहने आणि फायरेक्स मशील, मिस्टींग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणाही दिमतीला आहे. दैनंदिन स्वच्छता कामे अविरत सुरू असताना सखोल स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने मुंबईतील कानाकोपऱ्यातील, लहानसहान गल्लीबोळातील राडारोडा, कचरा उचलण्यासह स्वच्छतेची इतरही कार्यवाही होत असल्याने मुंबईकर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शनिवारी या भागात सखोल स्वच्छता अभियान!
परिमंडळ १ मधील विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, महर्षी कर्वे मार्ग, ऑपेरा हाऊस जंक्शन, चर्नी रोड स्थानक, मौलाना अब्दुल कलाम आझाद मार्ग; परिमंडळ २ मध्ये दादासाहेब फाळके मार्ग; परिमंडळ ३ मध्ये खेरनगर मार्ग, विवान उद्यान मार्ग; परिमंडळ ४ मध्ये स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भूयारी मार्ग, सोमवार बाजार, आरटीओ मार्ग; परिमंडळ ५ मध्ये विठ्ठल नारायण पुरव मार्ग, अणुशक्ती नगर, अंधेरी-घाटकोपर जोड रस्ता, असल्फा आणि साकीनाका मेट्रो स्थानक; परिमंडळ ६ मध्ये अमृत नगर, घाटकोपर पश्चिम, स्वामी नारायण चौक, हिरानंदानी जोड मार्ग, कैलास संकुल, महात्मा फुले मार्ग, विद्यालय मार्ग; परिमंडळ ७ मध्ये एम. के. बेकरी परिसर, मुख्य कार्टर मार्ग, नवीन जोड रस्ता कांदिवली, कांदिवली मेट्रो स्थानक यासह विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सर्व परिमंडळाचे संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी, स्थानिक नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.