मुंबई

BMC Election : मतदान केंद्रांवर मोबाईल न्यायचा की नाही? काही ठिकाणी मनाई, तर काही ठिकाणी परवानगी; मतदारांचा गोंधळ

सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असली तरी काही मतदान केंद्रांवर मोबाईल फोनबाबत असलेल्या विरोधाभासी नियमांमुळे मतदारांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज (दि.१५) सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, काही मतदान केंद्रांवर मोबाईल फोनबाबत असलेल्या विरोधाभासी नियमांमुळे मतदारांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. माहितीनुसार, काही केंद्रांवर पोलिस आणि मतदान कर्मचाऱ्यांनी मोबाईल आत नेण्यास मनाई केली आहे, तर काही केंद्रांवर फोन स्विच ऑफ करून मतदान कक्षापर्यंत नेण्याची परवानगी दिली जात आहे.

फोन ठेवण्यासाठी झिप लॉक पाऊच

सकाळीच मतदान केलेल्या अलका बी. यांनी सांगितले, “मी सकाळच्या वॉकनंतर थेट मतदानाला गेले आणि माझ्याकडे फोन होता. मदत केंद्राने व्हॉट्सअॅपवरच ई-स्लिप पाठवली, ज्यात मतदान केंद्राबाबत वगैरे सर्व माहिती होती. मला हार्ड कॉपीची गरज पडली नाही. मतदान कक्षाबाहेर फोन ठेवण्यासाठी झिप लॉक असलेला प्लास्टिकचा पाऊच दिला होता.”

फोन बंद ठेवणे अनिवार्य

यापूर्वीच बीएमसी निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे की, जर मोबाईल फोन बंद ठेवले असतील, तर त्यांना मतदान केंद्राच्या परिसरात आणण्याची परवानगी आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीत पोलिस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांकडून अनेक ठिकाणी मोबाईलची परवानगी दिली जात नसल्याने मतदार त्रस्त झाले आहेत.

ऑफिसला जाणाऱ्यांनी करायचं काय?...

मानखुर्द येथील कल्पना माटे म्हणाल्या, “ऑफिसला जाणारे अनेकजण सकाळी लवकर मतदान करतात. ते मोबाईल घरी ठेवून येऊ शकत नाहीत. एकटे प्रवास करणाऱ्यांसाठी फोन ठेवण्याची सुरक्षित जागा नसते. या गोंधळामुळे काही मतदार मतदान न करता परत जातील, ही भीती आहे.”

मतदानावर होणार परिणाम

मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांनी सोशल मीडियावर आणि हाऊसिंग सोसायटींच्या ग्रुपमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. बीएमसी, पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव मतदान टक्क्यावर परिणाम करू शकतो, असा आरोप रहिवासी करत आहेत.

मोबाईल नेण्यास परवानगी पण...

तथापि, बीएमसी कर्मचार्‍यांनी स्पष्ट केले आहे की, "मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल नेण्यास परवानगी आहे, मात्र तो स्विच ऑफ ठेवणे बंधनकारक आहे."

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?