मुंबई

BMC Election : राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटचे सर्व्हर डाऊन; मतदार यादीत नाव शोधण्यासाठी गोंधळ, सोशल मीडियावर संताप

महत्त्वपूर्ण निवडणूक असूनही, मतदानाला सुरुवात होताच पहिल्या तासातच तांत्रिक त्रुटी आणि प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीसाठी आज (दि. १५) सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. जवळपास चार वर्षांनंतर मुंबईला निवडून आलेले महापालिका प्रशासन मिळणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. मतदानासाठी शहरातील विविध मतदानकेंद्रांबाहेर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत. तथापि, महत्त्वपूर्ण निवडणूक असूनही, मतदानाला सुरुवात होताच पहिल्या तासातच तांत्रिक त्रुटी आणि प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे अनेक मतदारांना अडचणींचा सामना करावा लागल्याची माहिती समोर येत आहे.

मतदार यादीत नाव असूनही “Service Unavailable”

नावे नोंदवलेली असूनही, अनेक मतदारांनी दावा केला की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या (एसईसी) वेबसाइटवर 'माहिती उपलब्ध नाही' (Data not available), सेवा उपलब्ध नाही (Service Unavailable), असे दाखवले जात आहे, ज्यामुळे मतदान केंद्रांबाहेर उभारलेल्या मदत केंद्रांवर त्यांना ताटकळत उभं राहावं लागत आहे.

सोशल मीडियावर मतदारांची नाराजी - हेच का डिजिटल इंडिया?

राज्य निवडणूक आयोगाची वेबसाइट बंद झाल्याने त्याचे पडसाद सोशल मीडियावर पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गावंडे यांनी X वर लिहिले, “पूर्ण सर्कस: mahasecvoterlist.in ला आजच क्रॅश व्हायचं होतं? मतदार १९९५ सारखे धुळीने माखलेल्या कागदी यादीत नाव शोधत आहेत. हेच का डिजिटल इंडिया?” तात्काळ कारवाईची मागणी करत त्यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगालाही टॅग केले.

माझं नाव एका बुथवर तर...

दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी राज्यभरातील समस्या अधोरेखित केल्या आहेत. "महाराष्ट्रभरात, मतदारांना प्रत्यक्ष मतदार यादीतही त्यांची नावे सापडत नाहीयेत. मतदान केंद्रे विलीन केली आहेत. नावे दुसऱ्या ठिकाणी हलवली आहेत. माझे नाव एका मतदान केंद्रावर आहे, तर माझ्या पालकांची नावे पूर्णतः वेगळ्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या मतदान केंद्रावर आहेत. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे,” असे त्यांनी लिहिले.

अनेक मतदारांच्या तक्रारी

इतर अनेक वापरकर्त्यांनीही अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या. एसईसीची वेबसाइट डाऊन आहे, अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या तपशीलांमध्ये विसंगती आणि व्होटर स्लिप्सचा अभाव यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. मतदान न करताच घरी परतावे लागत आहे. काहींना तर छापील मतदार यादीत स्वतःच नाव शोधावे लागले, ज्यामुळे विलंब आणि गोंधळ वाढला.

१०,००० पेक्षा जास्त मतदान केंद्रे; सुरक्षा कडक

राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, राज्य निवडणूक आयोगाने, मुंबईतील एकूण १.०३ कोटी पात्र मतदारांसाठी १०,००० पेक्षा जास्त मतदान केंद्रे, ६४,००० कर्मचारी आणि २८,००० पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच, महिलांसाठी पिंक बुथ्स, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा ठेवण्यात आल्या आहेत.

संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ

आज सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. मतदान संपल्यानंतर EVM मशीन सुरक्षित झोनल केंद्रांवर हलवण्यात येतील.

तर मतमोजणी १६ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून सुरू होईल आणि निकाल संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?