मुंबई : काँग्रेसने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवण्यासाठी कसून प्रयत्न केले. मात्र, स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला २२७ जागांपैकी केवळ २४ जागांवर विजय मिळवता आला.
पक्षाने देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत १५२ जागांवर निवडणूक लढवली होती. तर उर्वरित जागा वंचित बहुजन आघाडी (व्हीबीए), राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) या आपल्या मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. २०१७ मध्ये काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या होत्या.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील व्हीबीए, आरएसपी आणि आरपीआय (गवई) यांच्यासोबतच्या युतीमुळे काँग्रेसला कोणताही फायदा झाला नाही. उलट विश्लेषकांनी याला मतवाढीऐवजी एक धोरणात्मक चूक म्हटले आहे.
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून बीएमसीचे नियंत्रण मिळवण्याच्या मार्गावर असताना काँग्रेस एक नगण्य खेळाडू बनली आहे. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने महाविकास आघाडी (एमव्हीए) भागीदार शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांच्यासोबत युती न करण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना (यूबीटी) आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत हातमिळवणी केल्यास आपले उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक मतांचे बँक दुरावेल, अशी भीती तिला वाटत होती. परंतु हे धोरण अयशस्वी ठरल्याचे राजकीय निरीक्षकांनी नमूद केले. त्याऐवजी पक्षाला दुहेरी फटका बसला. कारण भाजपने बिगर-मराठी हिंदू मतांचे आक्रमकपणे एकत्रीकरण केले, तर शिवसेना (ठाकरे) - मनसेने भाजपविरोधी मतांचा एक मोठा हिस्सा कायम ठेवला. यामुळे काँग्रेस दोन्ही बाजूंनी कोंडीत सापडली. अनेक पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये, भाषिक आणि धार्मिक ध्रुवीकरण आणि प्रति-ध्रुवीकरणामुळे काँग्रेसला भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर आपली जागा गमवावी लागली.
राजकीय निरीक्षकांनी काँग्रेसच्या या दारुण पराभवाचे श्रेय पक्षातील अंतर्गत कलह आणि सुसंगत प्रचार मोहिमेच्या अभावालाही दिले. भाजप आणि ठाकरे बंधूंनी अनुक्रमे पायाभूत सुविधा आणि मराठी अस्मितेवर लक्ष केंद्रित करत जोरदार प्रचार केला. तर काँग्रेसला एकसंध प्रचार मोहीम आखण्यातच संघर्ष करावा लागला. मुंबईतील काँग्रेस हा एकसंध शक्ती न राहता, वैयक्तिक बालेकिल्ल्यांचा पक्ष बनला आहे, असे एका विश्लेषकाने सांगितले. महायुतीचा सामना करण्यासाठी कोणताही चेहरा किंवा वेगळा अजेंडा नसल्यामुळे काँग्रेस पारंपरिक समर्थकांनाही प्रेरणा देऊ शकली नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे पाच शहरात महापौर - सपकाळ
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो. जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांचा निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ असे चित्र आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
शक्य तेथे स्वबळावर तर काही ठिकाणी आघाडी करून काँग्रेस पक्षाने वैचारिक व संघटनात्मक वाढीसाठी निवडणूक लढली.