मुंबई

अखेर रेसकोर्सची १२० एकर जमीन पालिकेच्या ताब्यात; राज्य सरकारची मंजुरी

महालक्ष्मी येथे साकारणार सेंट्रल पार्क, गार्डन अन् ओपन स्पेस, पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांची माहिती

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे/मुंबई

महालक्ष्मी येथील रेसकोर्सची २११ एकर जमीन ‘आरडब्ल्यूआयटीसी’ला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. २११ पैकी १२० एकर जमीन राज्य सरकारच्या मंजुरीनंतर पालिकेच्या ताब्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दैनिक ‘नवशक्ति’शी बोलताना दिली. ही १२० एकर जमीन पालिकेच्या ताब्यात आल्याने येथे मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क, गार्डन अन् ओपन स्पेस उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही डॉ. गगराणी यांनी सांगितले.

दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी येथील रेसकोर्सची एकूण २११ एकर जमीन ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब’ला १९१४ साली भाडेकरारावर देण्यात आली होती. हा भाडेकरार २०१३ मध्ये संपुष्टात आला. मात्र, त्यानंतर करार वाढवण्यात आलेला नाही. त्याची मुदत संपल्यानंतर या जागेपैकी १२० एकर जागा राज्य सरकारमार्फत पालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता देण्यात आली आहे, तर उर्वरित ९१ एकर जागा ‘आरडब्ल्यूआयटीसी’ला भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. पालिकेला सुपूर्द केलेली १२० एकर जमीन पालिकेच्या ताब्यात आल्याने रेसकोर्सच्या जमिनीचा वाद संपुष्टात आला आहे. त्यामुळे याठिकाणी लवकरच मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क, गार्डन अन् ओपन स्पेस उपलब्ध करण्यात येईल, असे पालिका आयुक्त डॉ. गगराणी यांनी स्पष्ट केले.

परस्पर सामंजस्याने वाद निकाली

जमिनीच्या विभाजनाशी संबंधित मुद्दे पालिका आणि ‘आरडब्ल्यूआयटीसी’ यांच्यात झालेल्या चर्चेअंती परस्पर सामंजस्याने सोडवले गेले. काही किरकोळ समस्या प्रलंबित आहेत, त्याही लवकरच सुटतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक