मुंबई : शाळा, रुग्णालये, मार्केट, वॉर्ड ऑफिस यांसह मुंबई महापालिकेच्या मालकीच्या इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी संरचनात्मक सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या इमारत विभागाकडून ‘स्ट्रक्चरल ऑडिट’साठी परवानाप्राप्त सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
जुन्या, धोकादायक आणि पुनर्बांधणी आवश्यक असलेल्या महापालिकेच्या इमारतींच्या दुरुस्ती, पुनर्वसन आणि नव्या इमारतींच्या बांधकामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका संरचनात्मक सल्लागार नियुक्त करणार आहे. शाळा, रुग्णालये, प्रशासकीय कार्यालये, दवाखाने, बाजार इमारती आणि इतर मालमत्तांची संरचनात्मक तपासणी करून आवश्यक पुनर्बांधणीचा आराखडा तयार केला जाणार आहे.
मुंबईतील अनेक महापालिका इमारती ३० ते ७० वर्षे जुन्या असून त्यापैकी अनेक इमारतींना मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. विशेषतः महापालिकेच्या शाळांच्या जुन्या इमारती, आरोग्य केंद्रे आणि विभागीय कार्यालयांबाबत सुरक्षेचा मुद्दा पुढे येत आहे. त्यामुळे तज्ज्ञ संरचनात्मक सल्लागारांची स्वतंत्र पॅनल नियुक्त करून इमारतींची सुरक्षितता तपासण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
सल्लागारांमार्फत इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, दुरुस्ती खर्च, पुनर्बांधणी आराखडे, भूकंपरोधक क्षमता, अग्निसुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा अभ्यास केला जाणार आहे.