मुंबई : प्रदूषण मुक्त मुंबईसाठी बांधकाम ठिकाणी, प्रकल्पाच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटदार व संबंधित संस्थांना केले आहे. तरीही प्रदूषण प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्यास कंत्राटदार व संबंधित संस्थेवर कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी के पूर्व व एम पश्चिम विभागात सुरु असलेल्या रविवारी बुलेट ट्रेन प्रकल्पासह विविध प्रकल्पांची पहाणी केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी व पर्यावरण संतुलन राखण्यासाठी कटिबद्ध आहे. मुंबईतील हवामान आरोग्यदायी राहावे, यासाठी पुढील काळातही नियमित पाहण्या, समन्वयात्मक कारवाई व कठोर अंमलबजावणी सुरू राहणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामकाज, उच्च न्यायालय व शासकीय वसाहत प्रकल्पाचे स्थळ, पानबाई शाळेच्या परिसरातील व लगतच्या रस्त्यांची पाहणी केली. तसेच खेरवाडी जंक्शन येथील सर्व्हिस रोडची पाहणी करून तेथील स्वच्छता, धूळ नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा ढाकणे यांनी घेतला.
मुंबईतील हवामान आरोग्यदायी राहावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिले.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच उपाययोजनांचा डॉ. ढाकणे यांनी विविध ठिकाणची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान के पूर्वचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला, एच पश्चिमच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लहान मुले, ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या!
कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणामुळे परिसरातील नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
या गोष्टींचे पालन कराच!
बांधकाम स्थळांवर धूळ उडू नये यासाठी पाण्याची नियमित फवारणी, साहित्य झाकण्यासाठी हिरव्या जाळीचा वापर, बांधकाम साहित्य वाहतूक करताना झाकणांचा वापर तसेच रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता केली जात आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. शाळा, दाट वस्ती असलेल्या भागात विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आली.