Mumbai : वृक्षसंवर्धन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई; अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचा इशारा, काही संस्थांविरोधात गुन्हे दाखल  (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : वृक्षसंवर्धन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई; अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचा इशारा, काही संस्थांविरोधात गुन्हे दाखल

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची काळजी घेणे काळाची गरज आहे. मात्र वृक्ष संवर्धन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.

Swapnil S

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची काळजी घेणे काळाची गरज आहे. मात्र वृक्ष संवर्धन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.

वृक्षांना इजा पोहोचविणे व मंजूर परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात वृक्षांची छाटणी केल्याप्रकरणी मालाड येथील दोन स्वतंत्र गृहनिर्माण संस्थांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळील शितल तपोवन हाऊसिंग सोसायटी लिमिटेड संकुलाबाहेरील वृक्षांना इजा पोहोचवल्याप्रकरणी संबंधित गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि विकासकाविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच घाटकोपर (पश्चिम) येथील कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या आवारातील वृक्षांची महानगरपालिकेने मंजूर केलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक छाटणी केल्याचे आढळून आल्याने संबंधित गृहनिर्माण संस्थेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील वृक्ष हे महानगराच्‍या पर्यावरणीय समतोलाचे महत्त्वाचे घटक आहेत. वृक्षसंवर्धन नियमांचे उल्लंघन करून वृक्षांना इजा पोहोचविणाऱ्या किंवा परवानगीच्या अटींचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा विकासकाला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. वृक्षांचे संरक्षण, संवर्धन आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधितांसाठी बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा विकासकाविरुद्ध यापुढेही नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.

मालाड (पूर्व) येथील दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळ डीजीएम शितल तपोवन हाऊसिंग सोसायटी आहे. या हाऊसिंग सोसायटीसमोरील दोन झाडांना विषारी इंजेक्शन देऊन ती सुकविण्यात आल्याची ऑनलाइन तक्रार पी उत्तर विभागाकडे प्राप्त झाली. या तक्रारीची दखल घेत उद्यान विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी तक्रारदार समवेत संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान हाऊसिंग सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यालगत असलेल्या पेल्टोफोरम प्रजातीच्या झाडाच्या बुंध्यावर जमिनीलगत सुमारे २० ते २२ छिद्रे पाडून त्यामध्ये विषारी इंजेक्शन देण्यात आल्याचे आढळून आले. तसेच, हाऊसिंग सोसायटीच्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोरील झाड पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. हाऊसिंग सोसायटीने झाडांना हानी पोहोचविल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाल्याने, संबंधितांविरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार कुरार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नागरिकांनी माहिती द्यावी!

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले की, कोणत्याही झाडाला इजा पोहोचविणे, विषारी द्रव्ये अथवा इंजेक्शन देणे, झाडे तोडणे किंवा नष्ट करणे हे कायद्याने दंडनीय अपराध आहेत. अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ संबंधित विभागाला माहिती देऊन पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर; १० टक्के पाणीकपात मागे घेण्याबाबत तूर्तास निर्णय नाही - अभिजीत बांगर

पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर; मदत आणि पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय जारी

घाटकोपर हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द

मंत्री नितीन गडकरींच्या नागपुरातील घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पश्चिम महाराष्ट्रातील ९१५ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील; सातारा जिल्ह्यातील ३०६ गावांचा समावेश, केंद्र सरकारचा मसुदा जाहीर