मुंबई : पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत कचऱ्याचे संकलन, परिवहन आणि विल्हेवाट हे कामकाज खासगी कंपन्यांकडून करून घेण्यासाठी १४ मे रोजी काढलेली निविदा तत्काळ रद्द करावी. तसेच, सफाई खात्याचा खासगीकरणाचा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी संघर्ष समितीच्या वतीने १५ जुलै रोजी मतदान घेऊन संपाचा निर्णय घेण्यात येणार आहे, तर १६ जुलै रोजी विधान भवन येथे मोर्चा काढण्याचा निर्णय समितीने बैठकीमध्ये घेतला आहे.
सदर बैठकीमध्ये पालिकेतील घन कचरा व्यवस्थापन खाते व परिवहन खात्यातील कायम कामगारांचे काम ठेकेदारामार्फत करून घेण्यासाठी काढण्यात आलेले निविदा ८ जुलै रोजी उघडण्यात येणार होती. त्यामुळे १ जुलै रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह, राणीबाग, भायखळा, मुंबई येथे आयोजित भव्य मेळाव्यात सदर निविदेविरोधात संप करावा की नाही, यासाठी ८ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. पण ८ जुलै रोजी उघडण्यात येणारी निविदा मनपा प्रशासनाने पुढे ढकलून १८ जुलै रोजी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निविदेविरोधात संप करण्याबाबत ८ जुलैऐवजी १५ जुलै २०२५ रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानामध्ये कामगारांचा जो निर्णय असेल त्याप्रमाणे १६ जुलै २०२५ रोजी मोर्चा काढून संपाबाबतची भूमिका घेण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या वतीने निमंत्रक वामन कविस्कर यांनी सांगितले.