मुंबई : पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वेस्थानकाजवळ उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने मार्ग काढावा तसेच भुयारी मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी मिळण्यासाठी राज्य शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
बोईसर येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद करून तेथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधण्या-संदर्भात गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृ-हात बैठक झाली.
बोईसर रेल्वे स्थानक येथील लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद करून रेल्वे उड्डाणपूल (आरओवी) उभारण्याबरोबरच भुयारी मार्ग बांधण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
१२५ कोटींचा खर्च
भुयारी मार्ग बांधण्यासाठी १२५ कोटी रुपये लागणार असून राज्य शासनामार्फत ६२.५० कोटी निधीची आवश्यकता आहे. यावर वन मंत्री नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांना दूरध्वनी करून भुयारीमार्गासाठी निधी देण्याची मागणी केली.
मुंबई : पालघर जिल्ह्यातील देहर्जे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मलवाडा येथील दराने भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करून तसा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करण्याचे निर्देश वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
देहर्जे प्रकल्पबाधितांच्या भूसंपादनाच्या मोबदल्यासंदर्भात नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पालघर जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यासाठी देहर्जे मध्यम प्रकल्प विक्रमगड तालुक्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी जांभे, साखरे व खुडेद या तीन गावातील २३८ हेक्टर खासगी जमिन संपादित करावी लागणार आहे. परंतु या संपादनासाठी देण्यात येणारा मोबदला अपुरा असल्याने त्यावर तोडगा काढण्याची मागणी प्रकल्पबाधितांनी केली होती. परंतु परिसरात जमिनीची खरेदी विक्री न झाल्याने मोबदला देण्यात येत नव्हता. जवळच्या मलवाडा येथील जमिनीच्या बाजारभावानुसार मोबदला देण्याचा प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात निर्देश दिले.