मुंबई : जागतिक वारसा असलेल्या मुंबई एशियाटिक सोसायटीची निवडणूक काही तासांवर आलेली असताना, आता वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. उच्च न्यायालयाने निवडणुकीच्या अंतिम टप्यात निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मात्र ३ ऑक्टोबरपर्यंत सभासद झालेल्यांना मतदानाचा अधिकार बहाल करण्याचा धर्मादाय उपायुक्तांचा निर्णय न्यायमूर्ती रेवते मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने रद्द केला. निवडणूक प्रक्रियेबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनीच निर्णय घ्यावा, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
मुंबई एशियाटिक सोसायटीच्या निवडणूकीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर तसेच माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांचे गट आमनेसामने आहेत. राजकीय शिरकाव आणि सभासदांचा वाढलेल्या आकड्यामुळे हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे गेले होते.