ऊर्वी महाजनी/मुंबई
चित्रपटात काम मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याच्या आणि नंतर तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.
न्यायमूर्ती श्याम चांदक यांनी सोमवारी या व्यक्तीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना निरीक्षण नोंदवले की, त्याने महिलेने ठेवलेल्या ‘विश्वासाचा गैरफायदा घेतला’ असून त्याच्याविरुद्ध बलात्काराचा सकृतदर्शनी गुन्हा बनतो. न्यायालयाने म्हटले, ‘आरोपीने महिलेने ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आहे. त्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे येथे बलात्काराच्या गुन्ह्याचा सकृतदर्शनी खटला दिसून येतो.’
शारीरिक संबंधाला केले प्रवृत्त
‘दक्षिण दिग्विजय’ नावाच्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी या महिलेने मे २०२४ मध्ये आरोपीशी संपर्क साधला होता. तिच्या काकांना ऑडिशन संदर्भातील एक पोस्टर दिसले होते, ज्यावर आरोपीचे नाव आणि क्रमांक होता. त्यांनी तो नंबर महिलेला पाठवला होता. आरोपीने तिला सांगितले की तो एका चांगल्या कथेच्या शोधात आहे आणि त्याने तिला चित्रपटात काम देण्याचे आश्वासन दिले. हळूहळू त्यांची मैत्री वाढली आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याने तिला चित्रपटात भूमिका मिळवून देण्याचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले.
विवाहित असल्याची माहिती ठेवली लपवून
महिलेने आरोप केला आहे की या कालावधीत आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढले होते आणि ते खासगी राहतील, असे आश्वासन दिले होते. तिने पुढे असाही दावा केला की तो विवाहित असून त्याला एक मूल आहे, ही गोष्ट त्याने कधीही उघड केली नाही. तिला त्याच्या विवाहाबद्दल नंतर समजले. आरोपीच्या पत्नीला या संबंधांबद्दल समजल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये महिला आणि आरोपीने त्यांचे संबंध संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल केले.
संबंध परस्पर संमतीने ठेवले
हे संबंध परस्पर संमतीने होते, असा युक्तिवाद आरोपीने केला आणि आपल्या फोनमधून फोटो व व्हिडीओ डिलीट केल्याचा दावा केला. तसेच कोठडीत घेऊन चौकशी करण्याची गरज नसल्याचेही त्याने न्यायालयासमोर मांडले. दरम्यान, आरोपीने आपले लग्न लपवून ठेवले आणि महिलेला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आश्वासन कधीही पूर्ण केले नाही. महिलेच आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढण्याचे आणि ते व्हायरल करण्याचे कोणतेही कारण नव्हते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.