मुंबईत फक्त कचरा आणि घाणच! हायकोर्टाची BMC वर तीव्र नाराजी; विभागाच्या वॉर्ड अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचे संकेत  संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबईत फक्त कचरा आणि घाणच! हायकोर्टाची BMC वर तीव्र नाराजी; विभागाच्या वॉर्ड अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचे संकेत

मुंबईतील रस्ते आणि विविध भागांत साचणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवरून उच्च न्यायालयाने गुरुवारी महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील रस्ते आणि विविध भागांत साचणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवरून उच्च न्यायालयाने गुरुवारी महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘संपूर्ण मुंबई कचरा आणि घाणीने भरली आहे,’ अशी परखड टिप्पणी करत न्यायालयाने परिस्थितीत सुधारणा न झाल्यास संबंधित विभागाच्या वॉर्ड अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे संकेत दिले.

कचरा व्यवस्थापनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे आणि मानक कार्यपद्धती सादर करण्याचे निर्देश देत याचिकांवरील पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड परिसरातील प्रदूषणाच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. डम्पिंग ग्राऊंडमुळे आसपासच्या नागरिकांना प्रदूषणाचा गंभीर त्रास होत असून रोगराई पसरण्याची भीती आहे. तसेच दूरवरपर्यंत दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा दावा याचिकांमध्ये करण्यात आला आहे.

या याचिकांची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी काही उपाययोजना करीत असले, तरी प्रत्यक्ष परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा दिसत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

मुंबईतील सर्व २६ प्रभागांमध्ये स्वच्छता राखण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची यादी तसेच कचरा व्यवस्थापनाची मार्गदर्शक तत्त्वे आणि मानक कार्यपद्धती सादर करण्याचे आदेश खंडपीठाने महापालिकेला दिले आहेत. पुढील सुनावणीवेळी या मार्गदर्शक तत्त्वांची आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती न्यायालयासमोर सादर करावी लागणार आहे.

यंत्रणा निष्क्रिय असल्यासारखी स्थिती

महापालिकेची यंत्रणा निष्क्रिय असल्यासारखी वाटत असून शहरात सर्वत्र कचरा दिसत आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. कचरा व्यवस्थापनासाठी स्पष्ट आणि प्रभावी मार्गदर्शक तत्त्वे असणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

खोटी आश्वासने नकोत

मुंबई शहर घाणीने भरले असून महापालिकेकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, अशा तीव्र शब्दांत न्यायालयाने प्रशासनाची कानउघाडणी केली. महापालिकेच्या कारभारात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी महापालिका आयुक्तांना आवश्यक निर्देश देण्याशिवाय न्यायालयासमोर पर्याय उरलेला नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

कचरा करणाऱ्यांवर मोठा दंड?

सार्वजनिक रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्या अथवा सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या व्यक्तींवर मोठा दंड आकारण्याचा तसेच आवश्यक असल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याचा विचार करावा, असा सल्लाही न्यायालयाने राज्य सरकारला दिला. मुंबईतील काही ठराविक ठिकाणी सातत्याने कचऱ्याचे ढीग साचत असतानाही संबंधित वॉर्ड अधिकारी कारवाई करीत नसल्याबद्दल खंडपीठाने चिंता व्यक्त केली. यापुढे अशा परिस्थितीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असे संकेत न्यायालयाने दिले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कृत्रिम फुलांना पसंतीची मोहोर; चिनी बनावटीच्या फुलांना पसंती, क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड

Mumbai : विद्यार्थ्यांनी घडवल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती; ‘फ्री प्रेस हाऊस’मध्ये भरला नवकलाकारांचा मेळा

Mumbai : ब्रीच कँडीकरांचा ‘बीएमसी फुटपाथ रिपोर्ट कार्ड’; ‘कारवाईची नोंद व जबाबदारी निश्चित करा, रहिवाशांची मागणी

BRICS Summit 2026 : ‘ब्रिक्स’ साठी जिनपिंग दिल्लीत येणार

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह इतरांवर न्यायालयात आरोपपत्र