मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणघुमाळीत निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या विरोधात दंड ठोकणारे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने दिलासा दिला. वैद्यकीय जामिनावर असलेल्या मलीक यांचा निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. त्यांनी न्यायालयाच्या अटीचा भंग केल्याने जामीन रद्द करावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या समोर प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी मलिक यांच्या वतीने ॲड. तारक यांनी याचिकेवर जोरदार आक्षेप घेतला. मलिक यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केलेले नाही. तसेच याचिकाकर्त्यांनी पुरावे म्हणून कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच मलिक यांनी नियमित जामिनासाठी याचिका दाखल केली असून ती प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने पुरावा असलेला पेनड्राईव्ह सादर करण्याचा प्रयत्न केला. याची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच याचिकाकर्त्यांनी करण्यात आलेल्या आरोपासंदर्भात दोन आठवड्यांत पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले.
अटीचा भंग केल्याचा आरोप
विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींचा भंग केला आहे, त्यांना पीएमएलए न्यायालयाच्या परवानगी शिवाय मुंबई क्षेत्राबाहेर प्रवास केल्याने त्यांचा वैद्यकीय जामीन रद्द करावा तसेच त्यांचा नियमित जामीनासाठी केलेली याचिका फेटाळावी, अशी विनंती करणारी याचिका सॅमसन अशोक पाथरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.