मुंबई

मुंबई: ११ वर्षांच्या मुलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न; मानसिक रुग्ण असलेल्या आईविरुद्ध गुन्हा

स्थानिक रहिवाशांच्या मदतीने रेखासह रुहानी यांना तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे रुहानीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Swapnil S

मुंबई : अकरा वर्षांच्या मुलीची हत्या करून आईने ब्लेडने हातावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. मृत मुलीचे नाव रुहानी सोलंकी, तर आरोपी आईचे नाव रेखा राज सोलंकी असल्याचे पोलिसांनी सागितले. रेखावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू असून, ती मानसिक रुग्ण आहे. वेड्याच्या भरात तिने सदरचे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी रेखाविरुद्ध हत्येसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही घटना गुरुवारी १५ फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता बोरिवलीतील नॅशनल पार्कजवळील कुलूपवाडी, गोरांक्ष धाम सोसायटीमध्ये घडली. इथे राजू पुंजाजी सोलंकी हा त्याची पत्नी रेखा आणि अकरा वर्षांची मुलगी रुहानीसोबत राहत होता. राजूच्या वडिलांचे एक सलून दुकान असून, याच दुकानाची सध्या त्याच्यावर जबाबदारी आहे. त्याची पत्नी रेखा ही मानसिक रुग्ण असून, तिला सतत वेड्याचे झटके येतात. त्यातून ती अनेकदा प्रचंड आक्रमक होते, ती काय करते याचा तिला भान नसते. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता तिने तिची मुलगी रुहानी हिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिने ब्लेडने स्वत:च्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रात्री उशिरा राज सोलंकी हे घरी आले असता, त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने रेखासह रुहानी यांना तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे रुहानीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

रेखाची प्रकृती गंभीर असल्याने तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश नंदीमठ यांच्यासह अन्य पोलीस पथकाने तिथे धाव घेतली होती. याप्रकरणी राज सोलंकी याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून, त्याच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रेखाविरुद्ध पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस