मुंबई

Mumbai : बोरिवलीतील ज्वेलरी दुकानात तब्बल ७ कोटींच्या दागिन्यांची चोरी; दोन सेल्समन फरार, पोलिसांकडून शोध सुरू

एक कर्मचारी अनेक वर्षांपासून दुकानात काम करत असल्यामुळे दुकानाच्या मालकाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : बोरिवली पश्चिम येथील एका दागिन्यांच्या दुकानात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनीच तब्बल ७ कोटींचे (₹६.७९ कोटी रुपये) सोने, हिरे आणि चांदीचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रभू सिंग (वय २०) आणि नारायण सिंग (वय २२) अशी आरोपींची नावे असून दोघेही राजस्थानमधील (राजसमंद) रहिवासी आहेत. ते बोरिवलीतील आयसी कॉलनी, होली क्रॉस रोडवरील रोझमार बिल्डिंगमधील 'माय गोल्ड पॉईंट' या ज्वेलरी दुकानात सेल्समन म्हणून काम करत होते. दुकानाचे मालक राकेश शांतीलाल पोरवाल यांनी याबाबत गुरुवारी (दि.१५) एमएचबी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

कशी झाली चोरी?

एफआयआरनुसार, चोरीची घटना मंगळवारी रात्री १०.३० ते बुधवारी दुपारी १.३० या वेळेदरम्यान घडली. मंगळवारी रात्री दुकान बंद करताना मौल्यवान दागिने लोखंडी तिजोरीत ठेवण्याची जबाबदारी पोरवाल यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना सोपवली होती. दुकान बंद करून हे दोघे आतच थांबले होते, अशी माहिती समोर आली आहे. बुधवारी पोरवाल हे वैयक्तिक कामासाठी डहाणूला गेले होते. याचदरम्यान, एका ग्राहकाने त्यांना फोन करून दुकान बाहेरून लॉक असल्याचे सांगितले. त्यानंतर पोरवाल यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना फोन केला असता त्यांचे मोबाईल बंद होते. त्यामुळे ते तातडीने मुंबईत परतले आणि दुकान उघडून पाहिले असता त्यांना दोन्ही तिजोर्‍या रिकाम्या असल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभु सिंग अनेक वर्षांपासून दुकानात काम करत असल्यामुळे दुकानाचे मालक राकेश पोरवाल यांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. तर, नारायण सिंग हा प्रभुच्या शेजारच्या गावातील असल्याने, त्याच्या विनंतीवरून पोरवाल यांनी त्याला नोकरी दिली होती. दोघेही दुकानातच राहायचे. रात्री दुकानाचे शटर बंद केल्यानंतर चाव्या त्यांच्याजवळच असायच्या, अशी माहिती आहे.

काय-काय चोरले?

चोरलेल्या दागिन्यांमध्ये ₹१५ लाखांचा सॉलिटेअर डायमंड, ८०० ग्रॅम आणि १ किलोच्या चांदीच्या विटा, ६५० ग्रॅम गहाण ठेवलेले सोने, १०० ग्रॅमचे दोन २४ कॅरेट गोल्ड बिस्किटे, २३ मंगळसूत्रे, २३५ हून अधिक कानातले, ३२५ अंगठ्या, ५० ब्रेसलेट, ८५ सोनसाखळ्या आणि इतर मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे.

आरोपी राजस्थानचे, शोधासाठी दोन पथके रवाना

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, दोन्ही आरोपी राजस्थानमधील त्यांच्या मूळ गावी फरार झाले आहेत. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.

मुंबईत NOTA झाला मोठा! कोणत्या प्रभागात सर्वाधिक वापर, कुठे अत्यल्प प्रतिसाद? बघा टॉप ५ लिस्ट

समुद्राखाली हालचाल! वसईच्या समुद्रात अचानक 'रिंगण'; थोडक्यात वाचली मासेमारीसाठी गेलेली बोट, मच्छिमारांमध्ये भीती, ज्वालामुखीचा संशय

दिल्लीनंतर आता मुंबईत उभारणार 'बिहार भवन'; जागा ठरली, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटीही मंजूर

Kalyan : देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे सुरू; मलंगगडाची २ तासांची चढाई अवघ्या १० मिनिटांत, पहिले दोन दिवस मोफत प्रवास

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या; २१ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती