Borivali- Virar Railway : विस्तारीकरणासाठी रेल्वेचे PVD तंत्रज्ञान; जमिनीच्या मजबुतीकरणाचा कालावधी सहा महिन्यांवर 
मुंबई

Borivali- Virar Railway : विस्तारीकरणासाठी रेल्वेचे PVD तंत्रज्ञान; जमिनीच्या मजबुतीकरणाचा कालावधी सहा महिन्यांवर

उपनगरीय रेल्वे जाळ्याच्या प्रलंबित विस्तारीकरणाला वेग देण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) बोरिवली-विरार पाचव्या व सहाव्या मार्गिका प्रकल्पातील दहिसर-मीरा रोड दरम्यानच्या पट्ट्यात मऊ जमीन बळकट करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

प्रतिनिधी

अभिषेक पाठक/मुंबई

उपनगरीय रेल्वे जाळ्याच्या प्रलंबित विस्तारीकरणाला वेग देण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) बोरिवली-विरार पाचव्या व सहाव्या मार्गिका प्रकल्पातील दहिसर-मीरा रोड दरम्यानच्या पट्ट्यात मऊ जमीन बळकट करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. प्रीफॅब्रिकेटेड व्हर्टिकल ड्रेन अर्थात पीव्हीडी या तंत्रज्ञानामुळे माती घट्ट होण्याचा कालावधी अनेक वर्षांवरून सुमारे सहा महिन्यांपर्यंत कमी होणार आहे. यामुळे रेल्वेच्या भराव बांधकामासाठी जमीन तयार करण्यास मदत होणार आहे.

बोरिवली-विरार या मार्गावरील मऊ जमिनीचे मुख्य अभियांत्रिकी आव्हान पेलण्यासाठी 'एमआरव्हीसी'ने हे तंत्रज्ञान स्वीकारले आहे. नैसर्गिकरीत्या माती घट्ट होण्यास अनेक वर्षे लागतात, ज्यामुळे बांधकामाला विलंब होतो व जमीन खचण्याचा धोका वाढतो. पीव्हीडी तंत्रज्ञानामुळे मऊ मातीत अडकलेले पाणी बाहेर पडण्यासाठी मार्ग तयार होतात आणि त्यामुळे जमीन कमी कालावधीत स्थिर होऊन तिला मजबुती मिळते.

असे वापरले तंत्रज्ञान

महामंडळाने दहिसर आणि मीरा रोड दरम्यान सुमारे ३ लाख २० हजार रनिंग मीटर पीव्हीडी बसवण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आतापर्यंत एक विशेष यंत्र तैनात करण्यात आले असून त्याची दररोज सुमारे ३ हजार रनिंग मीटर ड्रेन्स बसवण्याची क्षमता आहे. यापैकी सुमारे ३० हजार रनिंग मीटरचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. जागेची उपलब्धता आणि प्रकल्पाच्या गरजेनुसार अतिरिक्त यंत्रे तैनात केली जातील, असे 'एमआरव्हीसी'ने स्पष्ट केले. जमिनीच्या सुधारणेचा हा टप्पा किती लवकर पूर्ण होईल, हे काम करण्यायोग्य जागांची उपलब्धता आणि यंत्रांच्या वेगावर अवलंबून राहणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक स्वतंत्रपणे होणार

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक स्वतंत्र होण्यास मदत होईल, ताण कमी होईल आणि अधिक कार्यक्षम रेल्वे सेवा चालवण्यासाठी वाव मिळेल, अशी अपेक्षा आहे. सुरक्षितता, दर्जा आणि पायाभूत सुविधांची दीर्घकालीन स्थिरता कायम राखून प्रकल्पाची अंमलबजावणी वेगवान करण्यासाठी महामंडळ आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी पद्धतींचा अवलंब करत आहे, असे 'एमआरव्हीसी'चे मुख्य व्यवस्थापक (कॉर्पोरेट समन्वय) सुनील उदासी यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्यानात पोलीस गस्त, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक मागणीला केराची टोपली; उद्यान समिती अध्यक्षांचे पत्र दुर्लक्षितच

पुण्यात १९ विदेशी महिलांचे बेकायदा वास्तव्य

सरकारची खऱ्या प्रश्नांना बगल - अभिजीत दीपके

कुख्यात दाऊद टोळीच्या गुंडाला दुबईत अटक

कोयनेचे पाणी आता मुंबईकडे वळवणार