मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपविरोधात दंड ठोकणारे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना मलिक यांचा वैद्यकीय जामीन रद्द करा तसेच त्यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सॅमसन अशोक पाथरे यांनी याचिका दाखल केल्याने राजकिय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने दोन वर्षापूवी फेब्रुवारी २०२२ मध्ये नबाब मलिक यांना अटक केली होती. ते किडनी विकाराने त्रस्त असल्याने त्यानी नियमित जामिनाबरोबरच वैद्यकीय कारणास्तव जामीन अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला. मात्र सर्वाच्च न्यायालयाने जानेवारी २०२४ मध्ये तीन महिन्याचा वैद्यकीय जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यात वाढ केली. दरम्यान, मलिक यांनी उच्च न्यायालयात नियमित जामिनासाठी याचिका दाखल केली. ती प्रलंबित आहे.
जामिनाचा फायदा घेत नबाब मलिक यांनी भाजपचा विरोध झुगारून निवडणुकीच्या रिंगणात अजित पवार गटातून उडी मारली आणि प्रचाराचा सपाटा लावला. यालाच सॅमसन अशोक पाथरे यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला तेव्हा मलिक यांनी आपले अनेक अवयव निकामी झाल्याने त्यावर तातडीच्या उपचारांची गरज असल्यामुळे आपल्याला जामीन द्यावा, अशी विनंती केली होती.
याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना जानेवारी महिन्यात जामीन मंजूर करताना त्याचा वापर फक्त वैद्यकीय कारणासाठीच करावा, असे स्पष्ट करत तीन महिन्यांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर पुन्हा त्यात वाढ करत मलिक यांच्या नियमित जामिनाची याचिका प्रलंबित असेपर्यंत वैद्यकीय जामीन कायम राहील, असे स्पष्ट केले.
मलिक यांनी अटींचा भंग केला
मलिक यांनी अटींचा भंग केला आहे. निवडणूक प्रचार आणि बैठकांचा सपाटा सूर केला आहे. सध्या नवाब मलिक यांची प्रकृती पाहता त्यांना वैद्यकीय जामिनाची गरज नाही. त्यामुळे त्यांची नियमित जामिनाचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती याचिकेत केली आहे.