मुंबई : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईत अतिवृष्टी झाल्यास १२ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मुंबईकरांना वेळीच मदत पोहोचवणे शक्य होणार असून, मुंबईतील फ्लडिंग पाॅइंटवर वॉच असणार आहे.
वातावरणीय बदलांमुळे पाऊसही लहरी झाला आहे. तरीही पावसाचा अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळे मुंबईत कधी अतिवृष्टी होईल सांगणे कठीण आहे. मुंबईत आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकरांना योग्य ती मदत वेळीच मिळावी यासाठी मुंबई महापालिकेने आधीच कंबर कसली आहे. त्यात पावसाळीस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत आधी बसवलेले ५ हजार कॅमेरे आणि त्यानंतर बसवण्यात आलेले ५ हजार कॅमेरे तसेच अन्य २ हजार कॅमेरे अशाप्रकारे एकूण १२ हजार कॅमेरे यांच्या माध्यमातून मुंबईतील आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष असणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.