अमेय रेठरेकर / मुंबई
भारतीय राजकारणाने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. एकेकाळी सभांमधील आवेशपूर्ण भाषणे आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष हेच प्रचाराचे प्रमुख साधन होते. मात्र, आता राजकारण 'कन्टेन्ट क्रिएशन' आणि 'इमेज कन्सल्टन्सी'च्या युगात शिरले आहे.
महाराष्ट्राच्या महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत आपण पाहतोय की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते इतर बड्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच एक नवा 'पॅटर्न' स्वीकारला आहे तो म्हणजे लोकप्रिय सेलिब्रिटींकडून स्वतःची मुलाखत करून घेणे. बॉलिवूडचा अक्षय कुमार ते मराठी सिनेसृष्टीतील तेजश्री प्रधान, गिरीजा ओक, महेश मांजरेकर यांच्यापासून राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेण्याचा ट्रेंड स्थिरावलाय.
राजकीय सभांच्या धुरळ्यापेक्षा, वातानुकूलित हॉलमध्ये रंगणाऱ्या 'बिगर-राजकीय' गप्पा मतदारांच्या मनावर गारुड घालण्यासाठी आहेत.
जेव्हा एखादा अभिनेता एखाद्या नेत्याला विचारतो, तुम्ही आंबा कसा खाता? तुम्हाला ताण आल्यावर तुम्ही काय करता? किंवा रस्ते का रखडले? तेव्हा तो प्रश्न निव्वळ कुतूहलापोटी नसतो. त्यामागे एक सूक्ष्म 'मानसशास्त्रीय युद्ध' (Psychological Warfare) असते.
पत्रकारिता विरुद्ध सेलिब्रिटी संवाद : जबाबदारीची दरी
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचे मुख्य काम 'सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे' हे आहे. मात्र, सेलिब्रिटींच्या मुलाखतीत हा 'जाब' गायब असतो.
मराठी सिनेसृष्टी आणि राजकारणाचे नवे समीकरण
पूर्वी कलाकार राजकारणापासून अंतर राखून असायचे. मात्र, आता अमोल कोल्हे, आदेश बांदेकर, सुबोध भावे किंवा रितेश देशमुख यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते की, मनोरंजन आणि राजकारण यांमधील रेषा धूसर झाली आहे. कलाकारांसाठी ही स्वतःची एक वेगळी सामाजिक ओळख निर्माण करण्याची संधी असते, तर नेत्यांसाठी त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याची ही एक 'शॉर्टकट' पद्धत आहे
ज्वलंत मुद्द्यांना बगल
पत्रकारितेचे मुख्य काम 'जाब विचारणे' हे आहे. जेव्हा कलाकार ही जागा घेतात, तेव्हा 'क्रॉस एक्झामिनेशन' (उलटतपासणी) गायब होते. आंबा कसा खाता? या प्रश्नापेक्षा रस्ते का रखडले, हा प्रश्न लोकशाहीत जास्त वजनदार असायला हवा.
पक्ष आणि नेता कोणताही असो, कलाकारांनी घेतलेल्या मुलाखती केवळ एक सहज मुलाखती नसून एक 'वेल-डिझाईन्ड पीआर कॅम्पेन' असते.
यामध्ये प्रकाशयोजना, कॅमेरा अँगल्स आणि बॅकग्राऊंड म्युझिकचा वापर करून नेत्याला एखाद्या हीरोसारखे सादर केले जाते.
राजकीय नेत्यांच्या या 'बिगर-राजकीय' मुलाखतींना सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. यूट्यूब आणि फेसबुकवर या मुलाखतींचे व्ह्यूज कोट्यवधींच्या घरात जातात. मतदारांची भावनिक दिशाभूल आहे असं वाटत आहे.
अभिनेता/अभिनेत्री नेत्याला आदराने प्रश्न विचारतात, तेव्हा प्रेक्षकांच्या मनात त्या नेत्याची प्रतिमा उजळते. हे मनोरंजन नसून एक सूक्ष्म 'प्रपाेगंडा' असू शकतो.
महागाई, बेरोजगारी, पायाभूत सुविधांचा अभाव किंवा रखडलेले प्रकल्प यावर सेलिब्रिटी प्रश्न विचारत नाहीत. विचारले तरी ते अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे असतात, ज्यामुळे नेत्याला आपली बाजू सावरून धरता येते.
पत्रकारांच्या मुलाखतीत 'फॉलो-अप' प्रश्न असतात. नेत्याने दिलेल्या उत्तरातील विसंगती पत्रकार लगेच पकडू शकतात. याउलट, सेलिब्रिटींच्या मुलाखती या बहुतेक वेळा 'स्क्रिप्टेड' असतात.